शाळे विषयी जिव्हाळा जपत माजी विद्यार्थ्यांची अनमोल भेट, 1995–96 बॅचकडून शाळेला इन्व्हर्टर व बॅटरी सप्रेम भेट
कुंभारखेडा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रा योगेश कोष्टी |
शि.प्र.मंडळ, चिनावल संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल या शाळेच्या 1995–96 या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृसंस्थेविषयी असलेले प्रेम, आत्मीयता आणि कृतज्ञतेची भावना जपत शाळेला इन्व्हर्टर व बॅटरी सप्रेम भेट देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
आज आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी पण भावनिक कार्यक्रमात ही भेट अध्यक्ष सुनील भास्कर महाजन व मुख्याध्यापक गणेश सुभाष बाविस्कर यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी निलेश नेमाडे, चिनावल गावचे पोलीस पाटील ,संदीप राठोड, अतुल धांडे, सिंचन नेहेते, हर्षाली राणे तसेच इतर माजी विद्यार्थी प्रतिनिधी स्वरूपात उपस्थित होते.
विशेष म्हणजे, 1995–96 च्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून आर्थिक योगदान एकत्र करून ही इन्व्हर्टर व बॅटरी शाळेला भेट दिली आहे. विद्यार्थ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता यावेत आणि शाळेच्या मूलभूत सुविधांमध्ये भर पडावी, या उदात्त हेतूने ही देणगी देण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सुनील भास्कर महाजन यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, “शाळेचे माजी विद्यार्थी हीच शाळेची खरी संपत्ती असून त्यांनी आपल्या मातृसंस्थेशी जपलेली नाळ इतरांसाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार काढले.
मुख्याध्यापक गणेश सुभाष बाविस्कर यांनीही सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, “माजी विद्यार्थ्यांचे हे सहकार्य शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे ठरणार असून विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास याचा निश्चितच लाभ होईल.”
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने 1995–96 च्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले तसेच भविष्यातही अशाच प्रकारे माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. हा उपक्रम गावात आणि परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून, मातृसंस्थेबद्दलची नाळ जपणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


