Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सव सोहळ्यात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी

शरद पवारांकडून खडसेंच्या भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक; नाथाभाऊंनी जुन्या राजकीय आठवणींना दिला उजाळा

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके | ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५व्या वर्षात पदार्पणानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे आयोजित अमृत महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे, या सोहळ्याला राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली. त्यामुळे हा कार्यक्रम राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार होते. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव,केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, गुलाबराव देवकर दिलीप कांबळे, दिंडोरी खासदार भास्कर भगरे,पंढरपूरचे आमदार अभिजित पाटील, आमदार किशोर दराडे, माजी आमदार रमेश दादा चौधरी शिरीष दादा चौधरी दिलीप मोरे कैलास पाटील डॉ. बी. एस. पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, कैलास पाटील,प्रसेन्नजीत पाटील, रोहिणी ताई खडसे ,मंदाताई खडसे,यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांची आणि खडसे परिवारातील सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे खडसे परिवार आणि लोकनेते एकनाथराव खडसे अमृत महोत्सव समितीतर्फे संत मुक्ताईची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आमदार एकनाथराव खडसे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यासाठी नाथाभाऊंनी अविरत मेहनत घेतल्याचे सांगितले. विधानसभेत त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणातून विरोधी पक्षनेता म्हणून सक्षमपणे काम कसे करायचे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक अशक्य वाटणाऱ्या सिंचन योजना पूर्णत्वास नेल्या. संपूर्ण महाराष्ट्रात माणसे जोडणाऱ्या नाथाभाऊंनी ज्या पक्षात काम केले, तेथे निष्ठेने योगदान दिले. पुढे राजकीय मतभेद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाथाभाऊंसारखा लोकनेता पुन्हा होणे शक्य नाही, असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाचा आणि संघर्षाचा गौरव केला. नाथाभाऊ हे सरकारवर जोरदार हल्ला चढवणारे आक्रमक आणि संघर्षशील नेते असून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला त्यांचा परिचय आहे, असे ते म्हणाले. १९९० मध्ये दोघेही प्रथमच विधानसभेत एकत्र निवडून आल्याची आठवण त्यांनी सांगितली. आपण विधानसभेचे अध्यक्ष असताना खडसे विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत असत, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले. रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे पुन्हा समाजकार्यात सक्रिय झाल्याचा उल्लेख करत त्यांनी नाथाभाऊंनी शरद पवार यांचा आदर्श समोर ठेवावा आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, अशा शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कविता सादर करत एकनाथ खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खडसे यांच्याशी आपले जुने ऋणानुबंध असल्याचे सांगत त्यांनी मुक्ताईनगर, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी खडसे यांनी उल्लेखनीय कार्य केले असल्याचे नमूद केले. राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध जपले पाहिजेत आणि कोणतेही वैमनस्य कायम ठेवू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशाचा कारभार चालवणे आवश्यक असल्याचेही आठवले म्हणाले. आपण सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्री असल्याने पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत आपण आणि खडसे सध्या वेगवेगळ्या राजकीय आघाड्यांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार, संघर्ष आणि कटू आठवणींना उजाळा देत मनमोकळे भाषण केले. संत मुक्ताईला वंदन करून त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. जनतेने आजवर आपल्यावर भरभरून प्रेम केले असून, १९७८ मधील पहिल्या निवडणुकीची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. त्या निवडणुकीत अवघ्या एका मताने आपला पराभव झाला होता, असे त्यांनी नमूद केले.

१९९० च्या दशकातील राजकीय परिस्थितीचा संदर्भ देताना खडसे यांनी सांगितले की, विरोधी पक्षात असतानाही जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या सत्ताधारी नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. राजकीय मतभेद असले तरी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका त्याकाळी होती. पूर्वीच्या राजकारणात तीव्र मतभेद असले तरी व्यक्तिगत वैमनस्य नसायचे; मात्र सध्याच्या बदललेल्या राजकीय वातावरणाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

भारतीय जनता पक्षासाठी अनेक दशके निष्ठेने काम केल्याचा उल्लेख करत त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून केलेल्या कार्याचीही आठवण सांगितली. आयुष्यात आणि राजकारणात आलेल्या विविध संकटांचा उल्लेख करताना त्यांनी शरदचंद्र पवार यांचे विशेष आभार मानले. योग्य वेळी पवार यांनी आशीर्वाद आणि आसरा दिला नसता, तर आपण राजकारणाच्या पडद्यामागे फेकले गेलो असतो. काही काळ आपण ‘ब्रेकवर’ होतो; मात्र पवार यांनीच पुन्हा राजकीय प्रवाहात आणले, अशा भावना खडसे यांनी व्यक्त केल्या.

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबतच्या मैत्रीच्या तसेच संघर्षाच्या आठवणींनाही खडसे यांनी उजाळा दिला. २००० ते २०१४ या काळात महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसतानाही या नेत्यांनी पक्षाचा पाया भक्कम करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळेच आज भाजपला चांगले दिवस पाहता येत आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील राजकारण आणि आजच्या राजकारणात मोठा फरक पडला असून, सध्याची राजकीय परिस्थिती पाहून वेदना होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाचा, म्हणजेच पुत्राच्या निधनाचा उल्लेख करताना खडसे भावुक झाले. या कठीण प्रसंगी कुटुंबीय आणि जनतेने दिलेल्या खंबीर साथीमुळेच आपण पुन्हा उभे राहू शकलो, असे त्यांनी सांगितले. आजवर जनतेने दिलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल मनापासून आभार व्यक्त करत हे नाते भविष्यातही असेच कायम राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव केला. महाराष्ट्रात एकेकाळी भाजपचे राजकीय अस्तित्व मर्यादित होते. मात्र, पक्ष तळागाळात रुजवण्यासाठी ज्या नेत्यांनी सातत्याने मेहनत घेतली, त्यामध्ये प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांची यादी प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या नावांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही, असे स्पष्ट करत पवार यांनी खडसे यांच्या विधिमंडळातील कामगिरीपासून महाराष्ट्रातील भाजपच्या विस्तारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानापर्यंत विविध पैलूंवर प्रकाश टाकला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार यांनी खडसे यांच्या भाजपमधील योगदानाचे केलेले कौतुक हे कार्यक्रमातील महत्त्वाचे राजकीय वक्तव्य ठरले.

खडसे यांनी केवळ निवडणुका लढविण्यापुरते राजकारण मर्यादित न ठेवता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण भागात भाजपची मुळे घट्ट करण्यासाठी सातत्याने काम केले. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या विस्ताराचा इतिहास लिहिताना एकनाथ खडसे यांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही, असे पवार यांनी नमूद केले.खडसे यांच्या विधिमंडळातील कार्यकाळाच्या आठवणी सांगताना पवार यांनी आपल्या विधानसभेतील सुरुवातीच्या काळाचाही संदर्भ दिला. आपण १९६७ मध्ये प्रथम विधानसभेत निवडून आलो. त्यानंतर जनतेच्या प्रश्नांवर तळमळीने आणि प्रभावीपणे बोलणाऱ्या सदस्यांची भाषणे आपण आवर्जून ऐकत असू. त्यापैकी एक सदस्य एकनाथ खडसे होते, अशी आठवण पवार यांनी सांगितली. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न खडसे यांनी विरोधी बाकावरून सातत्याने आक्रमकपणे मांडले. प्रश्नांची मांडणी, अभ्यासपूर्ण भूमिका आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरत होते, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील आणि रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी मनोगत व्यक्त करत आमदार एकनाथराव खडसे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एकनाथराव खडसे अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी खडसे यांच्या सुमारे ४० वर्षांच्या राजकीय जीवनाचा आढावा घेतला. हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय हेतूने आयोजित करण्यात आलेला नसून एकनाथराव खडसे यांच्या प्रदीर्घ सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ द्वारे एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी अमृत महोत्सव समितीतर्फे एकनाथराव खडसे यांना देण्यात आलेल्या सन्मानचिन्हाचे वाचन केले. कार्यक्रमाच्या शेवटी अमृत महोत्सव समितीचे सचिव प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार व्यक्त केले. मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर दिंडी सोहळ्याद्वारे मान्यवरांना व्यासपीठाकडे नेण्यात आले

भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे तर्फे पंचायतीचे कुटुंबनायक ललित पाटील आणि इतर सदस्यांतर्फे एकनाथराव खडसे यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी डॉ दिलीप तिवारी, प्रमोद बऱ्हाटे लिखित आ एकनाथराव खडसे यांचे चरित्र आणि विशेषांक”नाथ पर्व” चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले या अमृत महोत्सव सोहळ्यास जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो नागरिक, कार्यकर्ते, समर्थक आणि खडसेप्रेमी उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती, जुन्या राजकीय संबंधांच्या आठवणी आणि एकनाथराव खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा झालेला गौरव यामुळे कोथळी येथील हा अमृत महोत्सव सोहळा विशेष ठरला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!