Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच; मृतांचा आकडा ५४३ वर, २७५ हून अधिक भारतीय बेपत्ता; १ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा अद्याप शोध सुरू

बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम; भारताकडून ६८.५ टनांहून अधिक मदतसामग्री

नेपाळ.मंडे टु मंडे न्युज | नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरामुळे परिस्थिती अद्याप गंभीर आहे. हिमनदी फुटणे, प्रचंड भूस्खलन आणि अचानक आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा ५४३ वर पोहोचला असून, १,००० हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये २७५ हून अधिक भारतीयांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर नेपाळमधील रसुवा, नुवाकोट, धाडिंग आणि चितवन या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावे, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. चीन-नेपाळ सीमेवरील ग्यारोंग पोर्ट परिसरातही पुराच्या पाण्याचा आणि मातीचा मोठा लोट आल्याने परिस्थिती बिकट झाली.
नेपाळ लष्कर, सुरक्षा दल तसेच भारताकडून पाठवण्यात आलेली मदत व बचाव पथके युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत. आतापर्यंत ३,७५० हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

१०८ भारतीय नागरिकांची सुटका
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळमधील पुरातून आतापर्यंत १०८ भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. याशिवाय काही नागरिक पुन्हा संपर्कात आले आहेत. रसुवा येथील जलविद्युत प्रकल्पातून रिपू कुमार, चेनेश्वर नरझरी, कृपा शंकर आणि मोहम्मद मिन्हाजुद्दीन यांच्यासह काही भारतीयांची सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, मागील दोन दिवसांत चीनमार्गे ५९८ भारतीय नागरिक सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले आहेत. चीनमध्ये अद्याप सुमारे ९०० भारतीय नागरिक असून, ते सुरक्षित असल्याचे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारताकडून मोठी मदत
भारताने नेपाळमधील बचाव आणि मदतकार्यासाठी आतापर्यंत ६८.५ टनांहून अधिक मदतसामग्री पाठवली आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानातून ११ टन मदतसामग्रीची आणखी एक खेप नेपाळला पाठवण्यात आली. या पथकात शोध व बचावकार्यांसाठी आवश्यक उपकरणे तसेच डीएनए चाचणीसाठी तज्ज्ञांचा समावेश आहे.

याशिवाय एकेरी मार्ग तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य असलेले १६ ट्रक नेपाळमध्ये पाठवण्यात आले आहेत. बाधित भागातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोर्टेबल पूल उभारण्यासाठी लागणारे साहित्यही लवकरच पाठवण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.
पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध, जखमींना मदत आणि संपर्क प्रस्थापित करण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!