जामनेर मध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्याला २०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
जामनेर.मंडे टु मंडे न्युज | (मंगळवार, ८ सप्टेंबर )शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक असलेल्या स्कीम पत्रक व टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी ७०० रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर २०० रुपये लाच स्वीकारणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून पकडले. भगवान रोहीदास गायकवाड (वय ५१, व्यवसाय नोकरी, भूमापक (प्रतिलिपी), वर्ग-३, रा. लहुलिला नगर, ढोकेनगरजवळ, भुसावळ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत ६५ वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या नेरी बु., ता. जामनेर येथील शेतीची मोजणी करायची असल्याने त्यांना स्कीम पत्रक व टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती आवश्यक होत्या. यासाठी त्यांनी २ सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालय, जामनेर येथे अर्ज केला होता.
या प्रती देण्यासाठी आरोपी भगवान गायकवाड यांनी तक्रारदाराकडे ७०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत ७ सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी पंचांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तडजोडीनंतर गायकवाड यांनी २०० रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
यानंतर जामनेर येथील उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी आरोपी भगवान गायकवाड यांनी पंचांसमक्ष २०० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही लाच स्वीकारल्याप्रकरणी २०१२ मध्ये भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती एसीबीने दिली. त्यामुळे लाचखोरीसंदर्भातील हा त्यांच्याविरुद्धचा दुसरा गुन्हा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी केले. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोहवा बाळु मराठे, पोकों प्रणेश ठाकूर आणि पोकों सचिन चाटे यांचा समावेश होता.
कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.


