मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते; चेन्नई वेस्ट झोन पोलिसांची नशिराबाद मध्ये होमगार्डची चौकशी
नशिराबाद.मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद येथील ताज नगर परिसरात राहणाऱ्या एका होमगार्ड जवानाची चेन्नई वेस्ट झोन पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःचे इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स वाढविण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीने मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार केल्याचा आरोप असून, त्या खात्यावर अश्लील व आक्षेपार्ह स्वरूपाच्या पोस्ट शेअर करण्यात आल्याने संबंधित प्रकरणात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.
या प्रकरणात नशिराबाद येथील ताज नगर परिसरातील होमगार्ड जवान मोहम्मद जुनेद शेख कुदबुद्दीन याची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया खात्यावर फॉलोअर्सची संख्या वाढविण्यासाठी हे बनावट खाते तयार केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या कथित बनावट इंस्टाग्राम खात्यावर अश्लील तसेच आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात आल्याने संबंधित राज्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई वेस्ट झोन पोलिसांचे पथक नशिराबाद येथे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचे बँकेचे पासबुक ताब्यात घेतले असून, त्यामध्ये कोणतेही संशयास्पद अथवा गैरव्यवहार झाले आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, संबंधित व्यक्तीला जळगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील कारवाई नेमकी काय झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणातील पुढील कारवाई आणि तपासाबाबतची माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून सुरू असून, तपासानंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

