रावेर तालुक्यात तरुणीचे अपहरण; गुंगीचे औषध देत आळंदीला नेऊन जबरदस्ती विवाह करून अत्याचार
रावेर, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | रावेर तालुक्यातील एका गावातील तरुणीला कथितरित्या गुंगीचे औषध देऊन अपहरण करण्यात आल्याची, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे नेऊन जबरदस्तीने विवाह लावून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह एकूण १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरुणी ही ११ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास व्ही. एस. नाईक कॉलेजकडे पायी जात होती. त्याच वेळी मुख्य संशयित आदित्य राजू महाजन (रा. रसलपूर, ता. रावेर) हा तिथे आला आणि “तुझ्याशी काम आहे, जरा माझ्यासोबत चल,” असे म्हणून त्याने तिला जबरदस्तीने आपल्या बाईकवर बसवले. तिथून तो तिला बऱ्हाणपूर रोडवरील शहापूर फाट्यावरून हटणूर गावाजवळ घेऊन गेला. तिथे आधीच पांढऱ्या रंगाची कार घेऊन त्याचे इतर नातेवाईक दबा धरून बसले होते. संशयितांनी पीडित तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि बिसलेरी पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून ते पाणी तिला पिण्यास दिले.
दरम्यान, गुंगीचे औषध पोटात गेल्यामुळे तरुणीला चक्कर आली आणि ती अर्धवट शुद्धीत असताना संशयितांनी तिला थेट पुणे जिल्ह्यातील अळंदी येथे आणले. तरुणी पूर्ण शुद्धीत नसताना मुख्य संशयित आदित्य महाजन याने तिच्याशी बळजबरीने लग्न केले. या बनावट लग्नाचे साक्षीदार म्हणून त्याच्या काही अनोळखी मित्रांनी कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. यानंतर आदित्यने तिला पुण्यातील एका खोलीत डांबून ठेवले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने कडाडून विरोध केला. मात्र, “तुझे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन आणि तुझ्या नातेवाईकांना पाठवेन,” अशी धमकी देत आदित्यने तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार केले. या संपूर्ण काळात संशयिताचा मावस भाऊ तिला जेवणाचे डबे आणून देऊन या गुन्ह्यात मदत करत होता.
या छळातून सुटका झाल्यानंतर पीडित तरुणीने रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली आपबिती सांगितली. तिच्या फिर्यादीवरून २६ मे २०२६ रोजी मध्यरात्री ३:०२ वाजता पोलिसांनी गुन्हा रजि. नं. २५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ६४(२)(M) (बलात्कार), १२३ (गुंगीचे औषध देणे), ८७, ३५१(२) (३) आणि ३(५) प्रमाणे मुख्य आरोपी आदित्य महाजन, राजू महाजन, हरीदास महाजन, दिनकर महाजन, गणेश महाजन, रुपेश महाजन, निकिता महाजन (सर्व रा. रसलपूर, रावेर), आदित्यचा मावस भाऊ (शिक्षक, रा. विरोदा, मध्य प्रदेश), एक कार चालक आणि लग्न लावून देणारा मित्र अशा एकूण १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज जनार्दन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस या गंभीर प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

