यावल तालुक्यातील व्यावसायिकांवर कारवाई, ४ बाल कामगारांची सुटका, तीघांवर गुन्हा दाखल
यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातील दुकानांवर कारवाई करण्यात आली. यात यावल शहर व चितोडा शिवारात एका रसवंतीवर आणी मांडा अर्थात रूमाली रोटी तयार करणाऱ्या व्यावसायीकाकडे पोलिसांनी कारवाई करीत तेथून चार बाल कामगार आढळून आल्याने त्या चारही बाल कामगारांची मुक्तता करून यावल पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली.
यावल – फैजपूर रोडवर चितोडा गाव-शिवारात सचिन धांडे यांच्या रसवंतीची पोलिसांनी तपासणी केली असता या ठिकाणी १३ वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून कामावर ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही बालकांची तेथून सुटका केली.
तसेच दुसरी कारवाई यावल शहरातील चोपडा रस्त्यावर मांडा अर्थात रूमाली रोटी तयार करणाऱ्या दुकानावर करण्यात आली. मांडे ( पोळी) तयार करण्याच्या दुकानात १२ वर्षीय एक अल्पवयीन मुलगा आणि १३ वर्षीय एक अल्पवयीन मुलगा अशी दोन्ही बालकामगार म्हणून कामावर होती. येथे सुद्धा पोलिसांनी कारवाई करत २ बाल कामगारांची सुटका केली. या प्रकरणी सचिन धांडे व आसीफ खान कुरेशी व आजीम साहेब या तीघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


