LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर बायोगॅस ठरतोय वरदान ; नशिराबादच्या शेतकऱ्याचा आदर्श
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | आखाती भागातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे LPG गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, ग्रामीण भागात बायोगॅस हा प्रभावी व पर्यावरणपूरक पर्याय ठरत असल्याचे नशिराबाद (ता. जळगाव) येथील उदाहरणातून स्पष्ट झाले आहे.
नशिराबाद येथील प्रगतिशील शेतकरी चंदन पाटील यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी उभारलेले बायोगॅस युनिट आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, त्यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा याच माध्यमातून पूर्ण होत आहेत. त्यांच्या पत्नी निशा पाटील यांनी सांगितले की, “दररोज सहा व्यक्तींचा दोन्ही वेळेचा स्वयंपाक बायोगॅसवरच होतो. पावसाळ्यात किंवा पाहुण्यांची संख्या वाढल्यास पर्याय म्हणून वर्षाकाठी केवळ एक LPG सिलेंडर लागतो.”
बायोगॅस युनिटमुळे केवळ इंधनाचा प्रश्न सुटलेला नाही, तर सेंद्रिय शेतीलाही चालना मिळत आहे. याबाबत चंदन पाटील म्हणाले, “बायोगॅस निर्मितीबरोबरच वर्षाकाठी सुमारे ४ ते ५ टन सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर आणि खर्च दोन्ही कमी होण्यास मदत होते.”
दरम्यान, जिल्हा परिषद जळगावच्या कृषी विभागामार्फत ‘नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम’ अंतर्गत मागील पाच वर्षांत एकूण ३२१ बायोगॅस युनिट्सची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेमुळे अनेक शेतकरी इंधन आणि खत या दोन्ही बाबतीत स्वयंपूर्ण होत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, LPG टंचाईच्या संभाव्य पार्श्वभूमीवर बायोगॅससारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे गरजेचे असून, यामुळे ग्रामीण भागात ऊर्जा स्वावलंबन साध्य होऊ शकते.
आवाहन:
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ‘नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाचा’ लाभ घ्यावा आणि स्वस्त इंधनासह सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे
