यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा
यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याशी शासकीय कार्यालयात घुसून शिवीगाळ, धमकी, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या सन २०१९ पासून या कार्यालयात सेवा बजावत असून यापूर्वीही ते नंदुरबार येथे कार्यरत होते.
शुक्रवारी (दि. २४ जुलै) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास फैजपूर(ता. यावल) येथील संजय उर्फ साहील हमीद तडवी (वय ५२) व त्याचा मुलगा रोहन साहील तडवी (वय ३०) हे दोघे प्रकल्प कार्यालयात आले. त्यांनी कार्यालयात प्रवेश करताच महिला वअधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी मोठ्याने आरडाओरडा करत अपमानास्पद व अश्लील भाषेत शिवीगाळ केली. अधिकाऱ्यांना धमकावत त्यांचा अपमान होईल असे कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोर अपमानास्पद भाषा वापरत “तुला बघून घेतो”, “कार्यालयात काम करू देणार नाही” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या. या गोंधळामुळे कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शासकीय कामकाज काही काळ विस्कळीत झाले.
यापूर्वीही २३ जुलै रोजी आरोपींकडून दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधून त्रास देण्यात आल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांशीही उद्धटपणे वागत दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी यावल पोलिस ठाण्यात धाव घेऊन सविस्तर फिर्याद दिली. त्यानुसार संजय उर्फ साहील हमीद तडवी व रोहन साहील तडवी या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार शिवीगाळ, धमकी, सरकारी कामात अडथळा, अधिकाऱ्याचा व इतर लागू असलेल्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार निलेश भाऊलाल चौधरी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला असून आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू आहे.
या घटनेनंतर शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, सरकारी कार्यालयात अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यक्त होत आहे.


