भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

रेशनच्या धान्यात भेसळ, कधी खडे तर कधी किडे ; आता तपासणार ‘एफडीए’! निकृष्ट धान्य आढळल्यास कारवाई

जळगाव. मंडे टु मंडे न्युज | स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित होणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत लाभार्थ्यांकडून सातत्याने तक्रारी होत आहेत. कधी तांदूळ किंवा गव्हात खडे, धूळ-कचरा, उंदरांच्या लेंड्या, तर कधी किडे आढळत असल्याचे प्रकार समोर येतात. या पार्श्वभूमीवर रेशनच्या धान्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे.

जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून धान्याची गुणवत्ता, साठवणूक व्यवस्था, दुकानातील स्वच्छता तसेच धान्य मोजण्यासाठी वापरली जाणारी साधने यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान निकृष्ट दर्जाचे अथवा भेसळयुक्त धान्य आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार संबंधित दुकानदारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात २ हजार १४७ रेशन दुकाने

जळगाव जिल्ह्यात तब्बल २ हजार १४७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. यामधून मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना दरमहा धान्याचे वितरण केले जाते. जिल्ह्यात सुमारे ८५ हजार कुटुंबे अंत्योदय योजनेचे, तर १ लाख २४ हजार लाभार्थी केसरी अर्थात अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामुळे रेशनच्या धान्याची गुणवत्ता हा थेट लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे.

धान्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणार

रेशन दुकानांमधून वितरित होणाऱ्या धान्यामध्ये कीटक, धूळ, कचरा, खडे किंवा कोणत्याही प्रकारची रासायनिक भेसळ आहे का, याची तपासणी करण्यासाठी धान्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.यासोबतच रेशन दुकानाचा परिसर स्वच्छ आहे का, धान्य साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोत्यांची स्थिती कशी आहे, धान्य जमिनीवर किंवा ओलसर ठिकाणी ठेवले जात नाही ना, तसेच धान्य मोजण्यासाठी वापरले जाणारे वजनकाटे स्वच्छ आहेत का, याचीही तपासणी केली जाणार आहे.

ग्राहकांकडून निकृष्ट धान्याबाबत तक्रारी

रेशन दुकानातून निकृष्ट दर्जाचे, दुर्गंधीयुक्त किंवा भेसळयुक्त धान्य दिले जात असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. मात्र, रेशन दुकानांतील धान्याची नियमित अन्न चाचणी करणारी स्वतंत्र यंत्रणा प्रभावीपणे सक्रिय नसल्याने अनेकदा तक्रारींवर ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र होते.आता या तपासणी प्रक्रियेत अन्न व औषध प्रशासनाचा सहभाग वाढल्याने रेशनच्या धान्याच्या गुणवत्तेवर अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार आहे.

रेशन दुकानदारांनाही ‘एफएसएसएआय’ नोंदणीची शक्यता

बाजारात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विविध घटकांना अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण अर्थात एफएसएसएआयच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. त्याच धर्तीवर स्वस्त धान्य दुकानांनाही या नियमांच्या कक्षेत आणून नोंदणी किंवा परवाना बंधनकारक करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

दमट, अंधाऱ्या खोल्यांमध्ये धान्याची साठवणूक

जिल्ह्यातील अनेक रेशन दुकाने अतिशय लहान, दमट, अंधाऱ्या आणि हवा खेळती नसलेल्या खोल्यांमध्ये सुरू असल्याचे चित्र आहे. अशा ठिकाणी धान्याची योग्य साठवणूक न झाल्यास ओलाव्यामुळे धान्याला बुरशी लागणे, ते खराब होणे तसेच किडे होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे तपासणीदरम्यान केवळ धान्याचा दर्जाच नव्हे, तर त्याची साठवणूक आणि दुकानातील स्वच्छतेची परिस्थिती यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

“आरोग्याशी तडजोड खपवून घेणार नाही”

“सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. रेशन दुकानांतील धान्याची गुणवत्ता आणि साठवणूक तपासण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तपासणीमध्ये नियमांचे उल्लंघन किंवा अस्वच्छता आढळल्यास संबंधित दुकानांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे एफडीएचे सहायक आयुक्त दिनानाथ शिंदे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!