बैल पोळा १० सप्टेंबरला ; श्री कृष्णाशी आहे संबंध, जाणून घ्या माहिती
जळगाव. मंडे टु मंडे न्युज | वर्षभर शेतात शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा पारंपरिक बैलपोळा सण यंदा १० सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. श्रावण अमावस्येला साजरा होणाऱ्या या सणाला ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून पूर्ण विश्रांती देऊन त्यांची पूजा, सजावट आणि कौतुक केले जाते.
अशी आहे बैलपोळ्याची पारंपरिक पद्धत
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्याची प्रथा आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना नदी, ओढा किंवा तलावावर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्यांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेक दिला जातो.बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, अंगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्यावर बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण आणि कासरा अशा विविध साहित्याने त्यांचा साजशृंगार केला जातो. काही ठिकाणी पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडेही घातले जातात.
यानंतर सजवलेल्या बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो. गावागावात बैलजोड्यांची मिरवणूक काढण्याचीही परंपरा आहे. सनई, ढोल-ताशांच्या गजरात बैलजोड्या एकत्र आणल्या जातात. काही भागांत पोळ्याची पारंपरिक गाणी अर्थात ‘झडत्या’ म्हणण्याची पद्धतही आहे.
पंचांगानुसार श्रावण कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी १० सप्टेंबरला सकाळी १०:३३ वाजेपासून ११ सप्टेंबर ८:५६ वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण आणि उपवास करण्यात येतात. पण १० सप्टेंबरला महाराष्ट्रात बैल पोळा साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्त्व असून, गावागावात बैलांना सजवून त्यांची पूजा करुन पुरणाचे नैवेद्य दाखवला जातो.
बैलपोळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
शेतीच्या कामात बैलांचे योगदान मोठे असल्याने त्यांच्या श्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. शेतकरी आपल्या ऐपतीनुसार बैलांचा साजशृंगार करून त्यांचा सन्मान करतात.ज्यांच्याकडे बैल नाहीत, ते मातीच्या बैलांची पूजा करून पोळा साजरा करतात. शहरी भागातही अनेक कुटुंबांमध्ये मातीच्या बैलांची पूजा करून गोडधोड नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यांसारखे पारंपरिक पदार्थही या दिवशी केले जातात.
पोळ्याशी जोडलेली पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी कंसाने पोलासूर नावाच्या राक्षसाला पाठवले होते. श्रीकृष्णाने त्याचा वध केला. हा दिवस श्रावण अमावस्येचा असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी पोळा साजरा करण्याची परंपरा असल्याची कथा सांगितली जाते.
महाराष्ट्रासह इतर राज्यांतही उत्सव
बैलपोळा हा मोठ्या उत्साहात. महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या काही भागांतही या सणाची परंपरा आहे. काही ठिकाणी याला ‘बेंदूर’ किंवा ‘पोलाला अमावस्या’ अशा नावांनी ओळखले जाते.आधुनिक काळात शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढले असले तरी बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण समाज आपल्या कृषीपरंपरेशी असलेले नाते जपत आहेत. बैलांचा सन्मान, त्यांच्या श्रमांप्रती कृतज्ञता आणि ग्रामीण संस्कृतीचा उत्सव, अशी या सणाची ओळख आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

