मुक्ताईनगर मध्ये ८.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, तस्कर पोलिसांच्या जाळ्यात, गुटखा तस्करांमध्ये घबराट
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज,प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करणाऱ्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ८ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून १८ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पूर्णाड फाट्याजवळील हॉटेल आरंभ परिसरात संशयित इनोव्हा (क्र. एमएच २८ एके ८९९९) अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहनासह आरोपीला ताब्यात घेतले. वाहनातून ४ लाख ३ हजार २०० रुपयांचा गुटखा, १६ हजार ८०० रुपयांची सुगंधित तंबाखू, ५०० रुपयांचा मोबाईल आणि ४ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण ८ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) जळगावचे अधिकारी योगराज सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून शेख सलीम शेख इस्माईल (वय ५९, रा. चिखली, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.


