मुक्ताईनगर मध्ये २० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त,बोलेरो पिकअपसह चालक ताब्यात ; बऱ्हाणपूरहून साठा आणला, हा गुटखा कोणाचा?
मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके || महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा (गुटखा) मोठा साठा मुक्ताईनगर पोलिसांनी बोदवड चौफुलीजवळील महेंद्रा हॉटेलसमोर कारवाई करून जप्त केला. या कारवाईत पानमसाला व जर्द्यासह बोलेरो पिकअप असा एकूण १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र हा प्रतिबंधित गुटखा कोणाचा? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. HR 84 1073) संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळून आले. तपासणी केली असता वाहनात करड्या व गुलाबी रंगाच्या एकूण ३६ विनालेबल एचडीपीई गोण्या आढळल्या.
यामध्ये प्रिमियम राजनिवास सुगंधित पानमसाल्याची ६,७५० पाकिटे, किंमत १० लाख १२ हजार ५०० रुपये, तसेच प्रिमियम जेड एन-०१ जाफरानी जर्द्याची ६,००० पाकिटे, किंमत ५ लाख ७६ हजार रुपये, असा एकूण १५ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा प्रतिबंधित साठा आढळला. वाहनाची अंदाजे किंमत ३ लाख २५ हजार रुपये असल्याने जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १९ लाख १३ हजार ५०० रुपये आहे.
या प्रकरणी वाहनचालक शुभमसिंग विद्यराम (वय २५, रा. आग्रा, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालकाने हा प्रतिबंधित साठा बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश येथून आणल्याचे सांगितले. मात्र तो कोणाकडून, कोणासाठी व कोणाच्या सांगण्यावरून आणला याबाबत माहिती देण्यास त्याने नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. वाहनाची कागदपत्रे व मालासंबंधी पावत्याही उपलब्ध नसल्याचे समोर आले.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पानमसाला व जर्द्याचे प्रत्येकी दोन पाकिटे विश्लेषणासाठी नमुना म्हणून घेतले असून उर्वरित साठा सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्रतिबंधित पदार्थाच्या पुरवठादार व उत्पादकापर्यंत तपास करून या साखळीत सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तुषार पाटील,पोशी रविंद्र धनगर,प्रशांत चौधरी आदींनी केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

