भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

मोठी बातमी : राज्यात विहिरी खोदण्यावर बंदी; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाचा मोठा निर्णय

मुंबई | मंडे टु मंडे न्यूज |सप्टेंबर महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने पाणीटंचाईची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भूजलाचे संवर्धन आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या ५०० मीटर परिसरात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी विहिरी खोदण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर भूजल उपशाचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आढळल्यास संबंधित विहिरींमधून भूजल उपशावर काही कालावधीसाठी मनाई करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून एक किलोमीटर अंतरातील विहिरींमधून होणाऱ्या भूजल उपशावर तात्पुरती बंदी आणण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

कमी पावसामुळे लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जलस्रोतांचे संरक्षण, पाण्याची गळती रोखणे आणि अवैध पाणी उपसा थांबविण्यावर भर देण्यात आला आहे. मांजरा धरणाच्या पाइपलाइनमधून होणारी पाण्याची चोरी रोखण्यासाठी लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांचा संयुक्त गट तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

खरीप पिकांचे नुकसान; पीक कापणी प्रयोगांवर भर

कमी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून, पीक कापणी प्रयोगांच्या माध्यमातून अचूक आणि पारदर्शक नोंदी ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या नोंदींच्या आधारे शेतकऱ्यांना पीक विम्याचा योग्य लाभ मिळण्यास मदत होणार आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठीही आगाऊ नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला शेवटचे प्राधान्य

पाणीटंचाई निवारणासाठीच्या उपाययोजनांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यापूर्वी इतर उपलब्ध उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे निर्देश आहेत. इतर उपाययोजना शक्य नसलेल्या ठिकाणीच टँकर किंवा बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्याची अट समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे टँकरच्या फेऱ्यांवर आणि पाणीपुरवठ्याच्या प्रक्रियेवर अधिक प्रभावी देखरेख ठेवता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!