सोशल मीडियावर ओळख, प्रेमसंबंध अन् लग्नाचे आमिष ; भुसावळातील लॉजमध्ये महिलेवर अत्याचार
भुसावळ. मंडे टू मंडे न्यूज | लग्नाचे आश्वासन देत एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात जालना जिल्ह्यातील एका २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप महिलेने आपल्या फिर्यादीत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची ओळख ऋषिकेश वाघ (वय २४, रा. धोंडखेडा, ता. भोकरदन, जि. जालना) याच्याशी ४ जून २०२५ रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवरून नियमित संवाद सुरू झाला. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दोघांची भेट ठरली होती. त्यानुसार महिला अमरावती येथून रेल्वेने भुसावळ येथे आली. भुसावळ रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये दोघांची भेट झाली. यावेळी आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन देत महिलेच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.
अत्याचारानंतर आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन दिल्याने महिलेने त्यावेळी पोलिसांत तक्रार केली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, त्यानंतर आरोपीकडून लग्नाबाबत टाळाटाळ होत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आरोपी तसेच त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांशी चर्चा झाल्यानंतर लग्नाबाबत समजूत झाल्याने तिने यापूर्वी तक्रार केली नसल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.
मात्र, आरोपी लग्न करण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिलेने १८ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद सय्यद करीत आहेत.
या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.


