वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त
चाळीसगाव. मंडे टु मंडे न्युज || गौताळा अभयारण्य परिसरात वनविभागाच्या विशेष पथकाने कारवाई करत वनमजुराच्या शेतातील घरातून अंदाजे दोन वर्षे वयाचे जिवंत नर काळवीट ताब्यात घेतले. दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.
Crime & Corruption Control Association (CCCA) कडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी काळवीट बांधून ठेवल्याचे आढळून आले. वनविभागाने त्याची सुरक्षित सुटका केली.
या प्रकरणी सुभाष शिवाजी कुऱ्हाडे (रा. शिवापूर), वनमजूर याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कलम ९, ३९(अ), ३९(ब), ४०(२) व ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
काळवीट हा संरक्षित वन्यप्राणी असून, त्याचा बेकायदेशीर ताबा किंवा विक्री करणे हा गंभीर वन्यजीव गुन्हा आहे. काळवीट कुठून आणण्यात आले, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि विक्रीचा प्रयत्न होता का, याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे.
दरम्यान, संबंधित वनमजुराच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याचीही या प्रकरणात भूमिका असल्याचा संशय CCCA कडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, ही बाब सध्या तपासाधीन असून, त्याबाबत पुराव्यांच्या आधारेच निष्कर्ष निघणे आवश्यक आहे.
गौताळा परिसरात गेल्या काही दिवसांत अंजन वृक्षतोड, चंदन तस्करी आणि आता जिवंत काळवीट जप्तीच्या घटना समोर आल्याने वन्यजीव व वनसंपदा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

