चाळीसगाव वनपरिक्षेत्रातील गौताळा अभयारण्यात अवैध वृक्षतोड : सागवानच्या ४ तर अंजनच्या ५७ बल्ल्यांसह ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त
चाळीसगाव, जि. जळगाव | मंडे टु मंडे न्यूज | गौताळा अभयारण्याच्या चाळीसगाव वनपरिक्षेत्रातील (वन्यजीव) जिवंत झाडांची अवैध तोड करून लाकडाची तस्करी केल्याप्रकरणी वन विभाग आणि Crime & Corruption Control Association (CCCA) यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल पाच दिवस तपास व हालचालींवर नजर ठेवल्यानंतर करण्यात आलेल्या या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सागवानाच्या ४ आणि अंजनाच्या ५७ अशा एकूण ६१ लाकडी बल्ल्या, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली.
CCCA ला मिळालेल्या गोपनीय माहितीची वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या समन्वयाने पडताळणी करण्यात आली. सलग पाच दिवस गोपनीय पद्धतीने निरीक्षण व तपास केल्यानंतर माहितीची खातरजमा झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यानंतर वन विभाग आणि CCCA च्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
तीन आरोपी ताब्यात
या प्रकरणात गोकुळ आनंदा गोपाळ (४०), अरविंद विजय जाधव (२०) आणि निलेश एकनाथ राठोड (२५), तिघेही रा. बोढरा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लाकूड वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर क्रमांक MH 19 CV 4603 आणि ट्रॉली क्रमांक MH 19 E 2685 जप्त करण्यात आली आहे. न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आल्यानंतर तिन्ही आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
अभयारण्यातील जिवंत झाडांची तोड गंभीर
या प्रकरणात भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम २६(१)(फ)(ड), ४१ व ४२, तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे CCCA कडून सांगण्यात आले.
गौताळा हे अधिसूचित वन्यजीव अभयारण्य असल्याने अभयारण्य क्षेत्रातील वनसंपदेची अवैध तोड व वाहतूक हा गंभीर प्रकार असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमातील तरतुदींनुसार अभयारण्यात परवानगीशिवाय वन्यजीव किंवा वनउत्पादनाचे नुकसान करणे अथवा काढणे प्रतिबंधित आहे.
संपूर्ण नेटवर्कचा तपास करण्याची मागणी
ही कारवाई केवळ तीन आरोपी आणि ६१ बल्ल्यांच्या जप्तीपुरती मर्यादित न ठेवता अवैध वृक्षतोडीमागील संपूर्ण साखळीचा तपास करावा, अशी मागणी CCCA ने केली आहे. झाडे अभयारण्यातील नेमक्या कोणत्या भागातून तोडण्यात आली, तोडणी व वाहतूक कोणी केली, लाकूड कोणाला विकण्यात आले आणि या प्रकरणामागे आणखी कोण व्यक्ती अथवा टोळी कार्यरत आहे, याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
CCCA ने पकडलेल्या आरोपींच्या मागील सहा महिन्यांतील CDR तसेच उपलब्ध WhatsApp कॉल/चॅटची कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करण्याची मागणी केली आहे. अशा तपासातून यापूर्वीच्या वनगुन्ह्यांबाबतही माहिती समोर येऊ शकते, असा संघटनेचा दावा आहे.
अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी
अवैध वृक्षतोड, वाहतूक किंवा तस्करीला कोणत्याही व्यक्तीने मदत अथवा संरक्षण दिल्याचे तपासात आढळल्यास, संबंधितांची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी CCCA ने केली आहे. मात्र, कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर आरोप करण्याचा संघटनेचा हेतू नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.वन गुन्ह्यांमध्ये आरोपींना मिळणाऱ्या कोठडीसंदर्भातील कागदपत्रे आणि तपासातील त्रुटींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पडताळणी करावी, अशी मागणीही CCCA ने केली आहे.


