सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; १ किलो वजनाचे देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या चोरीला
यावल. मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मनूदेवी माता मंदिरात अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून मनूदेवी माता व रेणुका माता यांच्या मूर्तीवरील दोन चांदीचे मुकुट आणि दोन चांदीच्या छत्र्या, असा सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात आणि भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मंदिर नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचा कडी-कोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला.
गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने मनूदेवी मातेच्या मूर्तीवरील ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, किंमत ४० हजार ५०० रुपये, तसेच २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री, किंमत २७ हजार रुपये चोरून नेली. त्याचप्रमाणे रेणुका मातेच्या मूर्तीवरील ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, किंमत ४० हजार ५०० रुपये, आणि २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री, किंमत २७ हजार रुपये असा एकूण १ किलो वजनाचा व १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला.
७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे सात वाजता मंदिराचे पुजारी व सेवक मंदिरात आले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मंदिराच्या दरवाजांचे कुलूप व गाभाऱ्याचा दरवाजा तुटलेला असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी आडगाव येथील रहिवासी शिवाजी प्रभाकर पाटील (वय ५१) यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


