Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव जिल्ह्यात रब्बी पीक विमा योजना लागू; सहा पिकांना मिळणार संरक्षण, अर्जासाठी पिकनिहाय मुदती जाहीर!

जळगाव.मंडे टु मंडे न्युज ||| रब्बी हंगामातील पिकांना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाने सन २०२६-२७ या वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. जळगाव जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सहा पिकांचा समावेश करण्यात आला असून शेतकऱ्यांना पिकनिहाय अंतिम मुदतीपूर्वी विमा अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.

सहा पिकांचा योजनेत समावेश

जळगाव जिल्ह्यात रब्बी ज्वारी (जिरायती व बागायती), गहू, हरभरा, रब्बी कांदा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. अधिसूचित क्षेत्रातील खातेदार शेतकऱ्यांसह कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरीही यासाठी पात्र आहेत. मात्र, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार विमा पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.

पिकनिहाय विमा संरक्षण आणि शेतकरी हिस्सा

योजनेत विविध पिकांसाठी निश्चित करण्यात आलेले विमा संरक्षण आणि शेतकऱ्यांना भरावा लागणारा हप्ता पुढीलप्रमाणे आहे.

  • रब्बी ज्वारी : विमा संरक्षण ३६ हजार रुपये, शेतकरी हिस्सा ३६० रुपये.
  • गहू : विमा संरक्षण ४५ हजार रुपये, शेतकरी हिस्सा ११२ रुपये ५० पैसे.
  • हरभरा : विमा संरक्षण ३६ हजार रुपये, शेतकरी हिस्सा ५४० रुपये.
  • रब्बी कांदा : विमा संरक्षण ९५ हजार रुपये, शेतकरी हिस्सा २३७ रुपये ५० पैसे.
  • उन्हाळी भुईमूग : विमा संरक्षण ४० हजार ६०० रुपये, शेतकरी हिस्सा १०१ रुपये ५० पैसे.

सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.

Farmer ID आणि ई-पीक पाहणी अनिवार्य

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) आवश्यक आहे. याशिवाय ई-पीक पाहणीची नोंद, बँक पासबुकची स्पष्ट प्रत, अद्ययावत आधारकार्ड आणि पीक लागवड घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. विमा अर्जात नमूद केलेले पीक आणि ई-पीक पाहणीतील नोंद यामध्ये विसंगती आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्व्हेतील नोंद ग्राह्य धरली जाणार असून अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच विम्यासाठी किमान ०.१० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा स्वतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्जाच्या अंतिम तारखा लक्षात ठेवा!

पीकनिहाय अर्ज करण्याच्या अंतिम मुदती पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • रब्बी ज्वारी : ३० नोव्हेंबर २०२६
  • गहू, हरभरा आणि रब्बी कांदा : १५ डिसेंबर २०२६
  • उन्हाळी भुईमूग : ३१ मार्च २०२७

चुकीची माहिती दिल्यास पाच वर्षे लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

पीक विमा योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांसाठी पीक विमा योजनेसह नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या कृषीविषयक डीबीटी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे अर्ज करताना अचूक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

अंतिम मुदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!