दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात दिव्यांग वैद्यकीय फेरतपासणीचे बनावट आदेश व प्रमाणपत्रे सादर केल्या प्रकरणी उपकार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे कार्यालयाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिव्यांग वैद्यकीय फेरतपासणीसंदर्भात बनावट आदेश, प्रमाणपत्रे तसेच संचालकांची बनावट स्वाक्षरी असलेली कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून उपकार्यकारी अभियंता माधव गोविंदराव केंद्रे यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक सुरेश आनंदा घटे (वय ५५, रा. विद्युत नगर, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दिव्यांग वैद्यकीय फेरतपासणी करण्यासंदर्भात आदेश देण्यात आल्यानंतर संशयित माधव केंद्रे यांनी ३ जुलै २०२५ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत स्वतःची वैद्यकीय फेरतपासणी झाल्याचे दर्शविणारे बनावट पत्र तयार केले. तसेच संबंधित संस्थेच्या नावाने बनावट प्रमाणपत्र आणि संचालकांची बनावट स्वाक्षरी असलेली कागदपत्रे तयार करून ती भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर येथील कार्यालयात सादर केल्याचा आरोप आहे.

या कागदपत्रांच्या माध्यमातून कार्यालयाची दिशाभूल करून फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची दखल घेत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संशयिताला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.





