ब्रेकिंग : जळगाव शहरात खळबळ! तरुणाच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; गोळीबार झाल्याची चर्चा, परिसरात भीतीचे वातावरण
जळगाव.मंडे टु मंडे न्युज || शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात मंगळवार दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास एका तरुणाच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार शस्त्रांनी सज्ज असलेल्या काही जणांनी परिसरात धाव घेत दहशत निर्माण केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेदरम्यान गोळीबार झाल्याचीही चर्चा परिसरात सुरू असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज नगरातील एका तरुणाचे घर हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते. काही जण धारदार शस्त्रे घेऊन तेथे दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मात्र, प्रत्यक्ष गोळीबार झाला की नाही, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही.

प्राथमिक अंदाजानुसार, हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोर कोण होते, हल्ल्यामागील नेमके कारण काय आणि गोळीबार झाल्याच्या चर्चेत कितपत तथ्य आहे, याचा तपास सुरू आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेचे नेमके स्वरूप आणि वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.





