Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमहाराष्ट्र

मंत्र्यांपासून मंत्रालयापर्यंत ओळखीचा दावा ; जळगाव, धुळे सह पाच जिल्ह्यांतील २४१ बेरोजगारांना नोकरीचे आमिष देऊन फसवणूक! बनावट नियुक्तीपत्रे दाखवून तब्बल २ कोटी ८५ लाखांचा गंडा

जळगाव, मंडे टु मंडे न्युज || राज्यातील बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीचे स्वप्न दाखवून मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, आणि नाशिक या पाच जिल्ह्यांतील तब्बल २४१ तरुणांना विविध शासकीय विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या माध्यमातून संशयितांनी २ कोटी ८५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणांची संख्या आणि रकमेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरटीओ, आरोग्य विभाग तसेच विविध प्रशासकीय विभागांमध्ये शिपाई, सफाई कामगार, वाहनचालक, कनिष्ठ लिपिक, लॅब टेक्निशियन, फार्मसी, कक्षसेवक आणि आरोग्य सेवक अशा पदांवर नियुक्ती करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. संशयित वैभव पोळ आणि अस्मिता वाघमारे यांनी मंत्री, त्यांचे स्वीय सहाय्यक, सनदी अधिकारी तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले जवळचे संबंध असल्याची बतावणी केली. नोकरीची शंभर टक्के खात्री देत तातडीने नियुक्ती आदेश मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे.

कविता नामक महिलेच्या माध्यमातून काही बेरोजगार तरुणांची वैभव पोळ आणि अस्मिता वाघमारे यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर या तरुणांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या पदांसाठी मोठ्या रकमा मागण्यात आल्या. या व्यवहारांसाठी अमोल, ओंकार आणि रूपेश यांच्यासह अन्य संशयितांनी मदत केल्याचे समोर आले आहे. धुळे, अलिबाग, रायगड आणि नाशिक येथील एकूण आठ हॉटेलमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे.

बनावट नियुक्तीपत्रे दाखवून विश्वास संपादन

तरुणांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना लवकरच नोकरीचे काम पूर्ण होईल, असे सांगून वेळ मारून नेण्यात येत होते. संशयित महागड्या वाहनांतून हॉटेलमध्ये येत असत. काही तरुणांना बनावट नियुक्ती आदेश दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. याच पद्धतीने इतर जिल्ह्यांतील बेरोजगारांनाही जाळ्यात ओढण्यात आल्याचा आरोप आहे.

असा आहे फसवणुकीचा आर्थिक हिशेब

उपलब्ध माहितीनुसार, शिपाई, सफाई कामगार आणि वाहनचालक या पदांसाठी ८३ तरुणांकडून तब्बल २ कोटी १२ लाख ९९ हजार रुपये घेण्यात आले. तर कनिष्ठ लिपिक, लॅब टेक्निशियन, फार्मसी, कक्षसेवक आणि आरोग्य सेवक या पदांसाठी १५३ तरुणांनी सुमारे ७२ लाख २५ हजार रुपये दिले.

ही रक्कम संशयितांकडे रोख स्वरूपात तसेच बँक खात्यांद्वारे, एनईएफटी आणि फोन-पेच्या माध्यमातून वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पैसे घेऊनही प्रत्यक्ष नियुक्ती न मिळाल्याने तरुणांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

८२ दिवसांत दिले पाच धनादेश; एकही वटला नाही

नोकरी मिळत नसल्याने काही तरुणांनी संशयितांकडे पैसे परत करण्याची मागणी केली. त्यानंतर वैभव आणि अस्मिता यांनी २२ जानेवारी ते १४ एप्रिल या ८२ दिवसांच्या कालावधीत अॅक्सिस बँकेचे पाच धनादेश दिले. यातील एक धनादेश ४५ लाखांचा, तर उर्वरित चार धनादेश प्रत्येकी ५० लाखांचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र, यापैकी एकही धनादेश बँकेत वटला नाही. त्यानंतर संशयितांनी तरुणांशी संपर्क तोडल्याचा आरोप आहे.

कुणी दागिने गहाण ठेवले, तर कुणी जमीन विकली!

या फसवणुकीमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. धुळे येथील एका तरुणाने नोकरीच्या आशेने आईचे दागिने गहाण ठेवले. इतकेच नव्हे, तर नुकतेच लग्न झालेल्या पत्नीचा नेकलेसही विकावा लागला. मात्र, नोकरी मिळाली नाही आणि दागिनेही गमवावे लागले.

जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही नोकरीच्या आशेने शेतजमिनीचा एक तुकडा विकला आणि मिळालेली रक्कम संशयितांकडे दिली.

तर नाशिक येथील एका तरुणाने नोकरी मिळाल्यानंतर लग्न करता येईल आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल, या अपेक्षेने खासगी सावकाराकडून पाच टक्के व्याजदराने कर्ज घेतले. मात्र, नोकरी न मिळाल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून व्याजाचा बोजाही वाढत आहे.

नोकरीचे स्वप्न दाखवून बेरोजगारांच्या आयुष्याशी खेळ

शासकीय नोकरीच्या अपेक्षेने तरुणांनी कुटुंबाची बचत, दागिने आणि शेती विकून पैसे उभे केले. मात्र, नोकरीऐवजी त्यांच्या वाट्याला आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने फसवणूक झालेल्या इतर तरुणांनीही पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!