लाचखोर पोलीस हवालदाराला ४ वर्षांची शिक्षा; १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते
नाशिक.मंडे टु मंडे न्युज |गुन्ह्यातील आरोपींना अटक करून पोलीस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. नाशिक तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रामचंद्र राजराम आडके यांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक तालुका पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये एका प्रकरणात तक्रारदार आणि त्यांच्या चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांना अटक करून पोलीस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी आरोपी हवालदार रामचंद्र आडके यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार २४ सप्टेंबर २०१४ रोजी गिरणारे आउट पोस्ट येथे पंच साक्षीदारांसमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आडके यांना रंगेहाथ पकडले होते. पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पूर्ण करून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे, कोर्ट क्रमांक ४, नाशिक यांच्या न्यायालयात झाली.
न्यायालयाने रामचंद्र आडके यांना दोषी ठरवत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत ३ वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.तसेच कलम १३(२) अंतर्गत ४ वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास अतिरिक्त ४ महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सचिन गीरवाडकर यांनी कामकाज पाहिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास शिवाजी लोंढे तसेच कोर्ट पैरवी अंमलदारांनी खटल्याच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

