गणेशोत्सवातील दारू बंदीवर हायकोर्ट संतापले! “१० दिवस दारू न मिळाल्यास व्यसनाधीन दारुड्या रुग्णांनी रुग्णालये भरतील”
पुणे .मंडे टु मंडे न्युज | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात दारू विक्रीवर १० दिवस बंदी घालण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुणे जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, केवळ पुणे जिल्ह्यातच अशी बंदी का? असा सवाल केला.
दारू विक्रीचे वैध परवाने असलेल्या व्यावसायिकांना सलग १० दिवस व्यवसायापासून रोखणे हा निर्णय मनमानी स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणात प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही, तर न्यायालयाला हस्तक्षेप करून योग्य आदेश द्यावा लागेल, असा इशाराही खंडपीठाने दिला.
मुख्य न्यायाधीश एम.सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. हॉटेल व्यावसायिक आणि दारू विक्रेत्यांच्या संघटनेने प्रशासनाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.
केवळ पुणे जिल्ह्यातच बंदी का?
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाच्या काळात दारू विक्रीवर निर्बंध घालण्याचा आदेश जारी केला होता. यावर सुनावणी करताना न्यायालयाने “केवळ पुणे जिल्ह्याचीच निवड का? यामागे काय तर्क आहे?” असा प्रश्न उपस्थित केला.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अशाच स्वरूपाची १० दिवसांची बंदी नसताना पुण्यालाच वेगळे का मानले जात आहे, असा सवालही न्यायालयाने केला. पुण्यातील नागरिक दारू प्यायल्यानंतरच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात, असे प्रशासनाला म्हणायचे आहे का, असा टोला न्यायालयाने लगावला.
‘१० दिवस दारू न मिळाल्यास रुग्णालये भरतील’
दारूचे व्यसन असलेल्या व्यक्तींवर सलग १० दिवसांच्या बंदीचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असेही न्यायालयाने नमूद केले. या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायाधीशांनी मिश्किल टिप्पणी करत, “अशा प्रकारे १० दिवस दारू बंद केली तर दारूचे व्यसन असलेले लोक रुग्णालये भरतील,” असे म्हटले.न्यायालयाने जिल्हा प्रशासनाच्या वकिलांना आदेश मागे घेणार आहात की नाही, असा थेट सवाल केला. निर्णय मागे घेतला नाही, तर न्यायालय योग्य आदेश पारित करेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
प्रशासनाकडून स्पष्टीकरण
यावेळी सरकारी वकिलांनी प्रशासनाची बाजू मांडताना, नियमांनुसार वर्षातील काही दिवस ‘ड्राय डे’ असतात. त्यामध्ये अनंत चतुर्दशीचाही समावेश असल्याचे सांगितले. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी आणि काही विशिष्ट वेळेत अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्ण १० दिवस दारूबंदीचा आदेश असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तसा आदेश नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
आदेशात उद्याच सुधारणा करणार
पुणे हा सुशिक्षित आणि पुढारलेला जिल्हा असूनही कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी इतक्या मोठ्या कालावधीसाठी निर्बंध का आवश्यक आहेत, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. यानंतर सरकारी वकिलांनी प्रशासनाच्या आदेशात सुधारणा करण्याची तयारी दर्शवली. गणेश चतुर्थी आणि विसर्जनाचा दिवस हे दोन दिवसच पूर्णपणे ‘ड्राय डे’ असतील; उर्वरित दिवसांमध्ये वेळेनुसार निर्बंध लागू राहतील, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील १० दिवसांच्या दारूबंदीच्या निर्णयाबाबत प्रशासनाला आता सुधारित आदेश काढावा लागणार असून, या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

