रावेर तालुक्यातील ३५ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा तिढा; आ.खडसेंनी मांडलेल्या अतारांकित प्रश्नानंतर मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे लेखी उत्तर
सावदा.ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील धुरखेडा येथील ३५ कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप प्रलंबित असून, हे काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी १५ मे २०२५ रोजी ‘जलसमाधी’ आंदोलनाचा इशारा दिला होता. या गंभीर विषयाकडे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत अतारांकित प्रश्न मांडून शासनाकडून यावर स्पष्टीकरण व कार्यवाहीची मागणी केली होती.
यावर मदत व पुनर्वसन मंत्री यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, धुरखेडा येथील बाधित ३५ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गट क्रमांक ६, १२, १६ व ७१ चे स्थळ निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी जळगाव, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जळगाव आणि उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना देण्यात आले आहेत. मात्र, धुरखेडा येथील ३५ घरांचे ‘विशेष बाब’ म्हणून पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खाजगी शेतजमिनीच्या मालकांचा विरोध असल्याने सध्या हे पुनर्वसन रखडल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे


