आता शेतकऱ्यांनाच विकत घेता येणार शेती, प्रॉपर्टी म्हणून शेती घेणाऱ्या बोगस शेतकऱ्यांना चाप
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | बदलत्या निसर्ग चक्रामुळे शेती व शेतकरीवर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस शेती करणे हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरत असल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली दबत आहेत. या शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा उठवण्यासाठी व प्रॉपर्टी म्हणून शेती विकत घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. यामुळेच शेतीच मूल्य दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. आता शेतकऱ्यांनाच शेती विकत घेता येईल, अशी घोषणा महसूल मंत्र्यांनी विधानसभेत केल्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, बोगस शेतकरी बनून शेती खरेदी करणाऱ्यांचा या घोषणेमुळे चाप बसला आहे.
राज्यात जगीन खरेदी करायची असेल, तर ती व्यक्ती शेतकरी असणे बंधनकारक आहे. यापुढे शेतकरी असल्याचा वैध पुरावा दिल्याशिवाय राज्यात कुणालाही जगीन खरेदी करता येणार नाही, अशी घोषणा नुकतीच गहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. राज्यात परराज्यातील व्यक्तींनी नियमबाह्य पद्धतीने जमिनी खरेदी केल्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. राज्यातील सर्व मुद्रांक अधिकाऱ्यांना जमाबंदी आयुक्तांच्या डेटाबेसचा थेट ऍक्सेस देण्यात आला आहे. यामुळे कोणतीही व्यक्ती जमीन नोंदणीसाठी आली, तर तिच्या नावावर राज्यात इतरत्र जमीन आहे का आणि तिचा सातबारा कुठे आहे, याची संपूर्ण माहिती मुद्रांक अधिकाऱ्याला जागेवरच उपलब्ध होणार आहे. राज्याबाहेरील शेतकरी नसलेली व्यक्ती संशयास्पद आढळल्यास तिची नोंदणी तत्काळ रोखून पडताळणी केली जाईल. या नवीन प्रणालीमुळे बोगस शेतकरी बनून जमिनी हडप करणाऱ्यांच्या साखळीला पूर्णपणे लगाम बसेल आणि खऱ्या शेतकऱ्यांना दिलास मिळणार असल्याने आता याची अंमलबजावणी केव्हापासून होईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मात्र या आधी जळगाव जिल्ह्यातील रावेर – यावल – सावदा – फैजपूर परिसरासह जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी नसताना शेतकरी असल्याचे खोटे पुरावे देऊन शेती खरेदी केली आहे. यांची चौकशी करावी अशीही मागणी केली जात आहे.
शेतीचे भाव स्थिर राहण्याची शक्यता – महसूल मंत्र्यांच्या या घोषणेमुळे आज ज्या शेतीच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत, त्या स्थिर होणार असून, जो शेतकरी आपली शेती वाढविण्याचा विचार करीत आहेत, त्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक जण शेती न करता केवळ गुंतवणूक म्हणून शेती घेऊन ठेवतात. त्यामुळे मूळ शेतकऱ्यांना कसण्यासाठी व त्यातून उत्पादन काढण्यासाठी शेती मिळणे कठीण झाले होते. आता त्याला लगाम लागणार असल्याचे बोलले जात आहे.


