मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी
मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके || मुक्ताईनगर तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असल्याच्या तक्रारी असलेल्या अवैध धंद्यांची विशेष मोहीम राबवून चौकशी करावी आणि कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यक्ती, वाहने, आस्थापना व मालमत्तेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत पोलीस प्रशासनासह संबंधित विभागांकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
निवेदनात तालुक्यातील सट्टा, जुगार, चक्री-मटका, सट्टा पेढ्या, अवैध दारू व हातभट्टी, परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून हॉटेल व भोजनालयांमध्ये होणारी मद्यविक्री, विनापरवाना गुरे वाहतूक व कायद्याच्या विरोधात होणारी कत्तल, विनारॉयल्टी मुरूम व गौण खनिजांचे उत्खनन-वाहतूक, अवजड वाहनांच्या परवाना व पासिंगबाबतच्या तक्रारी तसेच गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जुगार व सट्ट्याविरोधात महाराष्ट्र प्रतिबंधक जुगार अधिनियम, अवैध मद्यविक्रीबाबत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, गुरे वाहतूक व गोवंश संरक्षणाबाबत संबंधित कायदे, गौण खनिजांच्या बेकायदा उत्खनन व वाहतुकीबाबत खनिज कायदे तसेच अवजड वाहनांच्या नियमभंगाबाबत मोटार वाहन कायद्यानुसार तपासणी व कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विशेष मोहीम राबविण्याची मागणी
तालुक्यातील अवैध जुगार, सट्टा, चक्री व सट्टा पेढ्यांवर छापे टाकावेत, अवैध दारू व हातभट्टीविरोधात कारवाई करावी, तसेच हॉटेल व ढाब्यांमध्ये परवान्याच्या अटींचे उल्लंघन होत आहे का, याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच गुरे वाहतुकीच्या वाहनांची तपासणी, विनारॉयल्टी मुरूम व इतर गौण खनिजांच्या उत्खनन-वाहतुकीवर कारवाई, अवजड वाहनांचे permit, fitness, वजन व आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री-साठवणुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने नियमित तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाईचा लेखी अहवाल देण्याची मागणी
प्रत्येक संबंधित विभागाने केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल उपलब्ध करून द्यावा. तसेच तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, निवेदन देणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी असून, मागील काही दिवसांतील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्यालाही जीवघेणा हल्ला किंवा जीवे मारण्याची धमकी येण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडल्यास प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

