भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीचा छळ; विहिरीत १५ मिनिटे उलटे लटकवले, व्हिडिओ व्हायरल

दोन आरोपींना अटक; तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू, संतापजनक घटनेने खळबळ

यावल.मंडे टु मंडे न्युज. || यावल तालुक्यातील दहिगाव येथे एका ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीला विहिरीत तब्बल १५ मिनिटे उलटे लटकवून त्याची अंडरपँट काढून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करून व्हॉट्सॲपवर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसांनी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. तर तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दहिगाव येथील पाटील गल्लीतील नामदेव रामदास पाटील (वय ५०) यांनी यावल पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास दहिगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या न्हावरा रोडलगत वेडू शंकर पाटील यांच्या मालकीच्या विहिरीजवळ ही घटना घडली.

यावेळी संशयित नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील (वय २३) आणि पंकज उर्फ झग्या संतोष पाटील (वय २२, दोघे रा. दहिगाव) यांनी नामदेव पाटील यांचे दोन्ही पाय पकडून त्यांना विहिरीत उलटे लटकवून ठेवल्याचा आरोप आहे. सुमारे १५ मिनिटे त्यांना अशा अवस्थेत ठेवल्यानंतर त्यांची अंडरपँट काढून त्यांना चापटांनी मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या तिसऱ्या साथीदाराने मोबाईलद्वारे या घटनेचे चित्रीकरण केले.

जीवाला धोका असल्याची जाणीव असूनही छळ
फिर्यादी दिव्यांग असल्याची माहिती असतानाही केवळ त्यांची टिंगलटवाळी करणे आणि त्यांना घाबरविण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. विहिरीत उलटे लटकवले असताना पाय निसटल्यास फिर्यादी विहिरीत पडून त्यांचा जीव जाऊ शकतो, याची जाणीव असूनही संशयितांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर व्हायरल करून त्यांची समाजात बदनामी करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

दोन आरोपींना अटक; तिसऱ्याचा शोध सुरू
या प्रकरणी नामदेव रामदास पाटील यांच्या तक्रारीवरून यावल पोलिसांनी नितीन उर्फ मुन्ना पाटील, पंकज उर्फ झग्या पाटील आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दिव्यांग व्यक्तीच्या छळाच्या या घटनेमुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!