भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

खाजगी मोबाइलद्वारे ई-चलान केल्यास वाहतूक पोलिसांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वाहतूक पोलिसांकडून मोबाइलद्वारेच छायाचित्र काढून ई-चालान मशीनवर अपलोड करून नंतर दंड आकारण्यात येतो. मात्र आता नियम मोडणाऱ्या वाहनाचे खाजगी मोबाइलद्वारे छायाचित्र काढून चालान फाडल्यास आता वाहतूक पोलिसांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी नुकतेच जारी केले आहेत.

महाराष्ट्रात ई-चलान प्रणालीद्वारे चुकीच्या पद्धतीने दंड आकारले जात असल्याच्या वाढत्या तक्रारींवरून राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक पोलिस अधिकारी आणि अंमलदार त्यांचे खाजगी मोबाईल फोन वापरून मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढतात आणि नंतर सोयीनुसार ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करून दंड आकारतात, असा मुद्दा वाहतूक संघटनांनी उपस्थित केला होता.

राज्यात पहिल्यांदा  सन २०१५- १६ मध्ये ऑनलाइन चालान प्रणालीला सुरुवात झाली. हा प्रयोग पहिल्यांदा मुंबई मध्ये करण्यात आला. आणि मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर २०१९ मध्ये राज्यभरात ई-चालान यंत्राद्वारे ऑनलाइन दंड, चालान सुरू करण्यात आले.

या चालान प्रक्रियेसाठी शासनाने दिलेल्या ई-चालान मशीनद्वारेच छायाचित्र काढणे अपेक्षित असताना वाहतूक पोलिस अंमलदार स्वतःच्या मोबाइलमध्ये नियम मोडणाऱ्या वाहनचालकाचे छायाचित्र काढून सोयीनुसार ई-चालान मशीनमध्ये अपलोड करून दंड ठरवतात.

मिळालेल्या माहितीनुसार, विधान भवनात वाहतूक संघटनांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाहतूक संघटनांनी ई-चलान प्रणालीतील गैरवापराबाबत गंभीर आक्षेप नोंदवले. वाहतूक पोलिसांकडून खाजगी मोबाईल फोनचा वापर करून, प्रत्यक्ष वेळेव्यतिरिक्त इतर वेळी फोटो अपलोड करून चालकांकडून दंड आकारला जात असल्याचे वाहतूक संघटनांनी निदर्शनास आणून दिले.

या गंभीर मुद्द्यावर यापूर्वीच ई-चलानची कारवाई करताना खाजगी मोबाईल फोनचा वापर करू नये असे आदेश देण्यात आले होते. अद्यापही काही पोलीस अधिकारी/अंमलदार स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो काढून चुकीच्या पद्धतीने चलान तयार करत असल्याने राज्य परिवहन मंत्र्यांनी कारवाईची घोषणा केल्यानंतर अशा प्रकारे खाजगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई-चलान करताना कोणताही पोलीस अधिकारी/अंमलदार आढळल्यास, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या बैठकीनंतर राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी राज्यभरातील वाहतूक पोलिसांसाठी परिपत्रक जारी केले असून वाहतूक पोलिसांनी यासाठी केवळ ई-चालानचाच वापर करावा, अशी कडक सूचना या परिपत्रकानंतर वाहतूक पोलिसांना करण्यात आल्या आहेत. त्या मुळे आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, वाहतूक पोलिसांना खाजगी मोबाईलमधून गाड्यांचे फोटो काढणे महागात पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!