गुरूपौर्णिमा का साजरी केली जाते? महत्व काय आहे ? जाणून घेऊया
मंडे टु मंडे न्युज.(का.प्र.)- विशेष : – गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
गुरू पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो.आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.
गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.गुरू पूजन करण्यासाठी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।। या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धती प्रचलित आहे. याच दिवसाला व्यास पौर्णिमा असेही संबोधिले जाते.
गुरुपौर्णिमेची तारीख आणि तिथी
वैदिक पंचांगानुसार, यंदा आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात १० जुलै रोजी पहाटे १ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल आणि ११ जुलै रोजी पहाटे २ वाजून ०६ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार, १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल.
भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा १० जुलै २०२५ रोजी देशभर गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. ही तिथी गुरुंच्या स्मरणासाठी, त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी गुरूंच्या पायावर डोके ठेवून त्यांना वंदन करणे, उपवास व पूजन करणे, ही परंपरा शतकानुशतकांपासून चालत आली आहे.
गुरूपौर्णिमेसाठी मंत्र
ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
या मंत्राच अर्थ असा होतो की गुरू हा ब्र्ह्मासमान आहे जो सृष्टीची रचना करतो. गुरू विष्णु समान आहे जो सृष्टीचे पालन करतो आणि गुरू शंकरासमान आहे जो सृष्टीचे संहार करतो. गुरू हे स्वत:परम सत्य आहे, त्या गुरूंना माझा नमस्कार.”
भगवान शंकर आणि सप्तर्षी
पुराणकथांनुसार, आदियोगी भगवान शंकर हे जगाचे पहिले गुरू मानले जातात. शंकर भगवान दीर्घ काळ योगनिद्रेत गेले होते. त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी सप्तर्षींनी हजारो वर्षे तप केले. अखेर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी सप्तर्षींना योग, ध्यान व आत्मज्ञान याचे दिव्य शिक्षण दिले. याच दिवशी गुरुपौर्णिमेचा आरंभ झाला, असे मानले जाते. म्हणूनच हा दिवस संपूर्ण जगात ‘गुरूंच्या स्मरणाचा दिवस’ म्हणून पवित्र मानला जातो.
याचबरोबर, महर्षी व्यासांचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यांनी वेदांचे वर्गीकरण, महाभारताचे लेखन, आणि अनेक पुराणांचे संकलन केले. त्यामुळे त्यांना ‘व्यासदेव’ किंवा ‘आदिगुरू’ मानले जाते. म्हणूनच या दिवशी व्यास पूजनाची परंपरा आहे आणि या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ असंही म्हणतात
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
