अवैध वाळूने भरलेल्या डंपर च्या वजनाने गटारी वरील ढापा कोसळला
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक 13 आधीच समस्यांनी ग्रासलेला असतांना पुन्हा एक समस्या उद्भवली ती म्हणजे नव्यानेच बांधण्यात आलेली साईबाबा मंदिराकडून पोस्टगल्ली कडे जाणार्या रस्त्यावरील गटर व त्यावरील ढापा काल वजनदार डंपर मुळे तुटला. याला जबाबदार कोण ? डंपर मालक ? की निकृष्ट दर्जाचे काम करणारा ठेकेदार ? किंवा मग वैध किंवा अवैध पणे चालणाऱ्या डंपरांवर दुर्लक्ष करणारे प्रशासन ? किंवा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काम देणारा संबंधित विभाग….या बांधकाम पडण्या संदर्भात संबंधित जे कोणी जबाबदार असतील त्यांनी आपापसात जबाबदारी स्वीकारून ते बांधकाम तात्काळ करून द्यावे.अन्यथा कायदेशीर कारवाईला तोंड देण्यासाठी तयार रहावे.
गेल्या एका महिन्यापासून या धाप्याचे काम सुरू असल्याने रस्ता बंद होता. नागरिकांना रस्ता सुरू होण्याची प्रतीक्षा असतानाच, वाळू डंपरमुळे तो पूर्णपणे तुटून गेल्याने रहिवाशांची गैरसोय आणखी वाढली आहे. अवैध वाळू उपसा आणि मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि डंपरमुळे शहरातील रस्त्यांची आणि नागरिकांच्या राहण्याची आधीच दुरवस्था झाली आहे. या मुळे मुक्ताईनगरच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

