राज्यात अती मुसळधार पावसाचा इशारा, उत्तर महाराष्ट्रासह “या” जिल्ह्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी राज्यातील काही भागांत चांगला पाऊस झालाय. त्याच प्रमाणे १६ ऑगस्ट रोजीही राज्यात उत्तर महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात पुढील २४ तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागा कडून वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
त्याच प्रमाणे मराठवाड्यालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसंच मध्यम स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पडण्याची शक्यता असून पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याच बरोबर रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पालघर, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


