भोर गावात अघोषित लोडशेडिंग व अर्धवट थ्री-फेज लाईनमुळे जनजीवन विस्कळीत ; रावेर तहसीलदार व महावितरणला सामूहिक निवेदन
भोर, ता. रावेर मंडे टु मंडे न्युज. विकास धनगर || मौजे भोर, ता. रावेर येथे गेल्या अनेक दिवसांपासून व मार्च २०२६ पासून दररोज ५ ते ६ तास तसेच दिवस-रात्र मिळून ८ ते ९ तासांचे अघोषित व अनियमित वीज लोडशेडिंग सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील अपूर्ण थ्री-फेज (3-Phase) लाईनचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दि. ०८/०९/२०२६ रोजी उप कार्यकारी अभियंता, महावितरण रावेर, तहसीलदार रावेर व उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना सामूहिक तक्रार अर्ज दिला आहे.
अर्जातील प्रमुख तक्रारी :
अर्जात म्हटले आहे की, सायंकाळी व रात्रीच्या महत्त्वाच्या वेळी वीज गायब होत असल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडते. महावितरणच्या मोबाईल अॅपवर तक्रार करूनही कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही. भोर गावाच्या सभोवती शेती असल्याने रात्रीच्या अंधारात साप घरात शिरत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मजूर वर्ग, महिला व शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
अर्धवट थ्री-फेजमुळे ट्रान्सफॉर्मरवर ताण :
गावातील वाढता विजेचा भार व सुरक्षिततेसाठी मंजूर झालेले नवीन थ्री-फेज लाईनचे काम गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे बंद पडले आहे. काम अर्धवट व ठप्प असल्याने जुन्या वितरण यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून वारंवार ट्रान्सफॉर्मर ट्रिप होणे, लाईट जळजळणे व लोडशेडिंगचे प्रमाण वाढले आहे. थ्री-फेज पुरवठा उपलब्ध नसल्याने शेतीपंप, पिण्याच्या पाण्याच्या मोटारी व लघुउद्योगांचे मोठे नुकसान होत आहे.
यामुळे निर्माण झालेल्या अडचणी :
१) पेयजल योजना ठप्प : नियमित वीज व थ्री-फेज काम बंद असल्याने सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या मोटारी चालत नसून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
२) विद्यार्थ्यांचे नुकसान : संध्याकाळी वीज नसल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.
याप्रकरणी महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोपही अर्जात करण्यात आला आहे. तरी तात्काळ अघोषित लोडशेडिंग बंद करून बंद पडलेले थ्री-फेज लाईनचे काम तात्काळ पूर्ण करून मार्गी लावावे, अशी मागणी संजय रामदास भोलिराव, सुधीर अरुण सौंगिरे, नितीन नामदेव सांगळे व समस्त वीज ग्राहक ग्रामस्थ, भोर यांनी केली आहे..


