सुनसगाव-बेलव्हाळ चौफुलीवर भीषण अपघात; ओमनीच्या धडकेत पत्नी ठार, पती जखमी
नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे |
नशिराबाद जवळील सुनसगाव-बेलव्हाळ चौफुली परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने आलेल्या ओमनी वाहनाने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वराडसिम येथील रहिवासी आरती उमाकांत भारंबे (वय ४४) या आपल्या पती उमाकांत विठ्ठल भारंबे यांच्यासह खेडी जळगाव येथून पापड तयार करून ॲक्टिवा (क्र. एमएच १९ डीआर ३२४१) वरून सुनसगाव मार्गे बेलव्हाळ फाट्यावरून वराडसिमकडे जात होते. दि. २८ मे रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास गोजोरे गावाकडून नशिराबादकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी (क्र. एमएच ०४ ईडी ५६२) वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर गावातील उपसरपंच एकनाथ सपकाळे, राहुल नारखेडे तसेच वेफर्स व्यवसाय करणाऱ्या मंदाबाई भैय्या कोळी यांनी तत्काळ मदतीस धाव घेत दोघांना रिक्षाने सामान्य रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना गंभीर दुखापत झाल्याने आरती उमाकांत भारंबे यांचा मृत्यू झाला. तर उमाकांत भारंबे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त ओमनी चालकाचे नाव समजू शकले नसून तो मलकापूरहून नंदुरबारकडे जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.घटनेची माहिती मिळताच सुनसगावचे पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, पोउनि संजय कंखरे तसेच पोहेकाॅ धिरज मंडलिक यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून पुढील तपास पोहेकाॅ धिरज मंडलिक हे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच सुनसगावचे पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, पोउनि संजय कंखरे तसेच पोहेकाॅ धिरज मंडलिक यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून पुढील तपास पोहेकाॅ धिरज मंडलिक हे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
गतीरोधक व कठडे बसविण्याची मागणी
नशिराबाद-बोदवड रस्त्याचे रुंदीकरण झाल्यापासून या मार्गावर डंपर, ट्रक तसेच इतर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे सुनसगाव-बेलव्हाळ चौफुलीवर दोन्ही बाजूंनी गतीरोधक बसविण्यासह परिसरातील मोरीवर सुरक्षेसाठी कठडे उभारावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा