जळगाव जिल्हा परिषद अधिकाऱ्याच्या मालमत्तेने एसीबीही चक्रावली ! हजारांच्या लाचेच्या सापळ्यात अडकला अन् सापडले सोने, चांदी, प्लॅटिनम अन् ५.१६ कोटींचे घबाड !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्या मालमत्तेचा आकडा समोर येताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिसोदे यांच्या घराची आणि बँक लॉकरची झडती घेतली असता तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांचा ऐवज आढळून आला आहे. सोन्याचे बिस्कीट, सोन्याच्या पट्ट्या, अडीच किलोहून अधिक सोने, चांदीचे दागिने, प्लॅटिनम, लाखोंची रोकड आणि दोन घरे… या मालमत्तेच्या यादीने लाच प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढवले आहे.
१० हजारांच्या लाचेने उघडले कोट्यवधींचे प्रकरण!
सतीश शिसोदे हे जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागात वर्ग-१ चे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत. २ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध दहा हजार रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात सापळा कारवाई केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५१/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने आदर्शनगर परिसरातील स्वामी विवेकानंद सोसायटी येथील त्यांच्या राहत्या घराची तसेच जळगाव जनता सहकारी बँकेतील लॉकरची झडती घेतली. या झडतीत कोट्यवधींच्या मालमत्तेचा तपशील समोर आला.
सोन्याची बिस्किटे, पट्ट्या अन् २.५ किलोहून अधिक सोने!
झडतीदरम्यान सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते सोन्याच्या साठ्याने. तब्बल २ हजार ५२४.१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू आढळल्या असून त्यांची किंमत ३ कोटी ५१ लाख ८१ हजार १५३ रुपये इतकी आहे.
यामध्ये सोन्याची बिस्किटे, सोन्याच्या पट्ट्या, चेन, पेंडंट, लॉकेट, बांगड्या आणि अन्य दागिन्यांचा समावेश आहे.
याशिवाय ११ हजार ६३३.७ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तूंची किंमत १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये, तर १०१.०२ ग्रॅम वजनाच्या प्लॅटिनम दागिन्यांची किंमत ३ लाख ५५ हजार २८६ रुपये असल्याचे समोर आले आहे.
घरात रोकड, आदर्शनगरात दोन मालमत्ता!
घरझडतीमध्ये ७ लाख ९७ हजार ९२० रुपयांची रोकड आढळली. याशिवाय आदर्शनगर परिसरातील शिसोदे यांच्या नावाशी संबंधित दोन घरांची किंमत अनुक्रमे ४५ लाख आणि ६५ लाख रुपये अशी नोंदविण्यात आली आहे.
दोन्ही घरांची एकत्रित किंमत १ कोटी १० लाख रुपये असून घरातील मौल्यवान वस्तूंची अंदाजित किंमत २४ लाख ३९ हजार रुपये आहे. घरातील रोकड, दोन घरे आणि अन्य वस्तूंची एकूण किंमत १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपये असल्याचे एसीबीच्या माहितीत नमूद आहे.
बँक लॉकरमध्येच ३.७४ कोटींचा ऐवज!
घरातील झडतीनंतर जळगाव जनता सहकारी बँकेतील लॉकरची तपासणी करण्यात आली. या लॉकरमध्येही सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा मोठा साठा आढळला. लॉकरमधील ऐवजाची एकूण किंमत तब्बल ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
घरातील मालमत्ता आणि बँक लॉकरमधील ऐवजाची एकत्रित किंमत ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये इतकी झाली आहे.
मालमत्ता आली कुठून? एसीबीकडून आर्थिक व्यवहारांची तपासणी
दहा हजार रुपयांच्या लाचेच्या प्रकरणातून पाच कोटींहून अधिक मालमत्तेचा तपशील समोर आल्याने या संपत्तीच्या स्रोताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा झालेली मालमत्ता, तिचे आर्थिक स्रोत आणि संबंधित व्यवहार यांची तपासणी आता एसीबीकडून केली जात आहे.
५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणात अटक करण्यात आलेले सतीश शिसोदे यांना ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या मालमत्तेचे स्रोत, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित बाबींचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
दोन स्वतंत्र पथकांकडून झडती
ही संपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. बँक लॉकरच्या झडतीसाठी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तर घरझडतीच्या पथकात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हेड कॉन्स्टेबल सुनील वानखेडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज महाजन यांनी सहभाग घेतला.
दहा हजारांच्या लाचेच्या सापळ्याने सुरू झालेल्या कारवाईत पाच कोटींहून अधिक मालमत्तेचा ऐवज समोर आला आहे. त्यामुळे शासकीय पदाचा वापर करून संपत्ती जमवली गेली का, या प्रश्नाचे उत्तर आता तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

