जळगाव- शेळगाव- यावल रोडवर उघड्यावर मृत जनावरे टाकल्याने नागरिकामध्ये संताप ; तात्काळ कारवाईची मागणी
जळगांव/नशिराबाद. डॉ. दिपक लोखंडे / मंडे टू मंडे न्युज | नवीन जळगांव – शेळगाव यावल रोडवर भादली येथील महात्मा गांधी हायस्कूलपासून सुमारे 150 ते 200 मीटर अंतरावर सार्वजनिक रस्त्यालगत तीन मृत गुरे टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रहदारीच्या ठिकाणी मृत जनावरे उघड्यावर टाकल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून भादली ग्रामपंचायतच्या वतीने संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत जनावरे नियमानुसार डम्पिंग ग्राउंडमध्ये विल्हेवाट लावण्याऐवजी सार्वजनिक जागेत टाकण्यात आली आहेत. संबंधित ठिकाणाजवळ मैला गड्डा (खड्डा) असून प्रशासनाकडून त्या जागेचा विशिष्ट कारणांसाठी वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उघड्यावर मृत गुरे टाकल्याने दुर्गंधी, संसर्गजन्य रोगांचा धोका आणि पर्यावरणीय प्रदूषण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भादली ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नियुक्त होण्यापूर्वी सुमारे तीन महिन्यांपूर्वी भादली ग्रामपंचायतीतर्फे दवंडी देऊन मृत जनावरे उघड्यावर टाकू नयेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून काही व्यक्तींनी मनमानीपणे मृत जनावरे सार्वजनिक ठिकाणी टाकल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची भावना व्यक्त केली जात असून संबंधित प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून मृत जनावरांची विल्हेवाट लावावी, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच भादली ग्रामपंचायत विभागाने नागरिकांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडून त्वरित आणि प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
