जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाची हत्या ; अपघाती मृत्यूचा बनाव पोलिसांनी उधळला
रावेर,मंडे टु मंडे न्युज |बीरावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने आपल्या काकाची हत्या करून ती अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, रावेर पोलिसांनी अत्यंत वेगवान आणि वैज्ञानिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत या हत्येचा उलगडा करत आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहणी केली असता मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ३५८/२०२६ अन्वये हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९, रा. गारखेडा, ता. रावेर) याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून दीर्घकाळ वाद सुरू असल्याचे समोर आले.
तपासात उघड झाले की, २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता आरोपीने लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. गंभीर दुखापतीमुळे रामा थावरू बारेला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकला, जेणेकरून हा अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण होईल.
मात्र, पोलिसांच्या बारकाईच्या आणि वैज्ञानिक तपासामुळे आरोपीचा डाव फसला. २२ जुलै २०२६ रोजी अनिल जखा बारेला याला अटक करण्यात आली असून, प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


