निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा मोठा साठा जप्त, अन्न औषध विभागाची कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सध्या सण वारांचे दिवस सुरू आहेत. सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठा सजल्या आहेत. आणि अशातच जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील ‘चौधरी स्वीट्स अँड नमकीन’ या दुकानावर धाड टाकून निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा मोठा साठा अन्न औषध विभागाने जप्त केला.
सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढत असते.आणिव्याच काळात बाजारात मिळावट केलेली निकृष्ठ दर्जाची मिठाई सह इतर खाद्य पदार्थ विकले जात असतात. अशा प्रकारे जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असतो. याच पार्श्वभूमीवर बोगस निकृष दर्जाच्या मिठाईचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाने (FDA) उधळून लावला.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील ‘चौधरी स्वीट्स अँड नमकीन’ या दुकानावर धाड टाकली असता तपासणीत दुकानात अत्यंत अस्वच्छ वातावरणात मिठाई तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी तयार होत असलेल्या पदार्थांचा दर्जा अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणारा होता. यामध्ये पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गाठी पदार्थांचा समावेश होता. या मिठाईचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने, प्रशासनाने नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. उर्वरित १५१ किलो मिठाई, ज्याची किंमत २४,१३० रुपये आहे, ती नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आली.
जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या, अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार करणाऱ्या किंवा भेसळयुक्त मालाची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कृ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी के. ए. साळुंके, आकाश बोहाडे, योगराज सूर्यवंशी, आकांक्षा खालकर आणि पद्मजा कढरे यांनी केली. या कारवाईमुळे भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


