जळगाव जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर! आ. नंदकिशोर महाजन यांची पोलीस महासंचालकांची भेट
मुक्ताईनगर मधील अवैध धंद्यांच्या प्रश्नालाही भेटीमुळे महत्त्व; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
मुक्ताईनगर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी || जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच पोलिसांसमोरील विविध आव्हानांबाबत विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह पोलिसांसमोरील विविध समस्या आणि आव्हानांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

विशेष म्हणजे, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा आणि अंतुर्ली परिसरासह विविध भागांतील अवैध धंद्यांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. भाजपचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मोहन महाजन यांनी देखील या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. मात्र, निवेदनानंतरही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नंदकिशोर महाजन यांनी थेट पोलीस महासंचालकांची भेट घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेताना मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांच्या प्रश्नाकडेही वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आता वरिष्ठ पोलीस प्रशासन या प्रश्नांची कितपत गंभीर दखल घेते आणि अवैध धंद्यांविरोधात ठोस कारवाईचे निर्देश दिले जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






