Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल तालुक्यात वाघाच्या दर्शनाने खळबळ! शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

यावल. मंडे टु मंडे न्युज || यावल तालुक्यातील मोहराळा-हरिपुरा रस्त्यावरील एकोरा नाल्याजवळ रात्रीच्या सुमारास मोठ्या पिवळसर रंगाचा वाघ दिसल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऐन रात्री रस्त्यावर वाघ दिसल्याने शेतकरी, दुचाकीस्वार आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फैजपूर येथून उपोषणासाठी जात असलेले नितीन कोळी आणि पांढरा वस्ती येथील दशरथ भिल हे मोटारसायकलने प्रवास करत असताना त्यांना रस्त्यावर मोठा वाघ दिसल्याचे त्यांनी सांगितले. अचानक समोर आलेला वन्यप्राणी पाहून दोघांचीही धांदल उडाली.

दरम्यान, परिसरात एक नव्हे तर तीन ते चार वाघांचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वडरी धरणालगतच्या आसरबारी पाडा-वस्ती परिसरात तसेच नागादेवी भागातही वाघ दिसल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या वृत्ताची वन विभागाकडून अधिकृत खातरजमा होणे आवश्यक आहे.

रात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

सध्या अनेक शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जातात. ग्रामीण भागातील नागरिकांचीही या रस्त्यांवरून नियमित ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत या भागात वाघाचा वावर असल्याची शक्यता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह दुचाकीस्वारांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

वन विभागाने तातडीने पाहणी करण्याची मागणी

मोहराळा-हरिपुरा रस्त्यावरील एकोरा नाला परिसर, आसरबारी पाडा आणि नागादेवी भागात वन विभागाने तातडीने पाहणी करावी. वाघाच्या वावराची प्रत्यक्ष खातरजमा करून आवश्यकतेनुसार गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शक्यतो एकट्याने शेतात जाणे टाळावे. वाघ किंवा अन्य वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, छायाचित्र काढण्यासाठी गर्दी करणे अथवा पाठलाग करणे टाळावे. अशा घटनेची माहिती तातडीने वन विभागाला द्यावी. तसेच वाघांच्या संख्येबाबत किंवा वावराबाबत खात्री नसलेल्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!