विवाहित तरुणीचा हुंडाबळी मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या..
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | डंपर घेण्यासाठी हुंडा म्हणून माहेराहून वीस लाख रुपये आणावे म्हणून भाग्यश्री राहुल परदेशी ( वय २८) या विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला गळफास देऊन जीवे मारून टाकल्याची घटना जामनेर तालुक्यातील पहूर जंगीपुरा (ता. जामनेर) येथे दि. ८ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. भाग्यश्री राजपूत हिला तीन वर्षाचा मुलगा असून तिच्या मृत्यू मुळे मात्र बाळाचे मातृछत्र हरपले.
अधिक वृत्त असे की, बुधवार दिनाक ८ रोजी रात्री २ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान पती राहुल परदेशीसह सासू रेखाबाई राजपूत, सासरे गोविंद राजपूत व दीर सुनील राजपूत यांनी संगनमताने गळफास देऊन जीवे मारून टाकल्याची फिर्याद विवाहितेची वडील सरदार बाबुलाल परदेशी (रा. पांगरा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिली आहे. भाग्यश्री राजपूत हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सासरच्या लोकांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी माहेरच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
वाळूचे डंपर घेण्यासाठी हुंडा म्हणून माहेराहून वीस लाख रुपये आणावे म्हणून भाग्यश्री राहुल परदेशी ( वय २८) या विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला गळफास देऊन जीवे मारून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल सासरच्या चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पती राहुल राजपूत व सासू रेखा राजपूत यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. त्या नंतर मृत भाग्यश्री हिचे पहुर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. मृत भाग्यश्री हिचे जंगीपुरा येथे चोख पोलीस बंदोबसतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनास्थळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम यांनी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे करीत आहेत.

