ठेकेदाराचा निर्लज्ज कारभार ; पूर्णा नदीपात्रालगत गाडला कचरा नगरपंचायतीच्या निष्क्रियतेवर संताप
Muktainager, Monday To Monday News प्रतिनिधी : शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराने भोंगळ कारभार करून मुक्ताईनगरकरांचे जीवन अक्षरशः नरकासमान केले आहे. शहरातून संकलित करण्यात आलेला कचरा थेट शहरालगत असलेल्या पूर्णा नदीपात्राच्या बॅकवॉटरमध्ये खड्डा काढून टाकण्यात येत असून शहरवासीयांच्या आरोग्याची सरळ खेळ सुरू आहे. त्यामुळे शहरात दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांना पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.परिणामी शहरात दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य व रोगराईचे संकट निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याशी सरळसरळ खेळ सुरू आहे.
नगरपंचायत प्रशासनाने डोळेझाक करून या ठेकेदाराला दरमहा लाखो रुपयांची बिले अदा केली जात आहेत.मात्र प्रत्यक्षात शहरातील रस्ते, गल्ल्या व परिसर कचऱ्याने भरून गेलेले आहेत. मोदी सरकारच्या स्वच्छ भारत मिशनला नगरपंचायत प्रशासनाकडून तिलांजली दिली जात असल्याची तीव्र टीका नागरिकांकडून होत आहे. एकीकडे गणेश विसर्जनानंतर फडणवीस सरकार स्वच्छ भारत मिशन च्या धरतीवर स्वच्छ महाराष्ट्र मिशन राबवत असताना मुक्ताईनगर नगरपंचायत अंतर्गत या कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या भोंगळ व भ्रष्ट कारभाराबद्दल शहरात तीव्र नाराजीची लाट पसरली आहे. या ठेकेदाराचा धस मुसळेपणा एवढा वाढला आहे की एकीकडे केंद्र व राज्य शासन नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर टॅक्स मेसेज करून वारंवार आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करत आहे व हा ठेकेदार त्याच्या मगरुरी मध्ये शहराचा सत्यानाश करत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या ठेकेदाराच्या कारभाराविषयी विधानसभेत तक्रारी मांडल्या होत्या. मात्र राजकीय वरदस्त असल्यामुळे या ठेकेदाराची दादागिरी अजूनही सुरूच आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना घाणीचे व अस्वच्छतेचे चटके सहन करावे लागत आहेत.
दरम्यान, काही महिन्यांवर आलेल्या नगरपालिका निवडणुकीत हा मुद्दा तापदायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व भ्रष्टाचार करणाऱ्या या ठेकेदाराला आश्रय देणाऱ्यांना मुक्ताईनगरकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

