बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून २३ लाखांची चोरी !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक, निशाद साळवे : गॅस कटरच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम तोडत त्यातील २२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रक्कम चोरट्यांनी काढून नेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री २ सुमारास सिन्नर येथील सरदवाडी रस्त्यावर उपनगरात वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम मध्ये ही घटना घडली. मात्र दुपारी चारला चोरी उघडकीस आली.
याबाबत सविस्तर असे, सिन्नर-सरदवाडी रस्त्यावर हॉटेल अजिंंक्यताराजवळ क्सिस बॅँकेचे एटीएम आहे. यात हिताची कंपनीमार्फत कॅश लोड केली जाते. गुरुवारी रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायर्स पकडीच्या साहाय्याने तोडल्या. एटीएमचे शटर बंद करून चोरट्यांनी अद्ययावत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापले. चोरट्यांनी एटीएम मशीनमधील 22 लाख 71 हजार 300 हजार रुपये घेऊन पोबारा केला. जातांना चोरट्यांनी एटीएमचे शटर बंद करुन घेतले.दसर्याच्या दिवशी दुपारपर्यंत एटीएम बंद होते.
एटीएम केंद्राचे शटर खाली असल्याने ते बंद असावे असा स्थानिक रहिवासी, व्यावसायिक व नागरिकांचा समज झाला. एकास शंका आल्याने शटर वर करून पाहिले त्यावेळी मशीन फोडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपअधीक्षक सोमनाथ तांबे, निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलिसांनी परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. सरदवाडी मार्गावरील विविध दुकानांमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. घटनेची माहिती ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष झाडे यांना कळविण्यात आली.त्यानंतर रितसर तक्रार दाखल करण्यात आली. फॉरेन्सिक लॅबच्या तसेच सायबर तज्ज्ञांनी एटीएम केंद्रातून ठशांचा शोध व माहिती घेत आहेत.


