नशिराबाद परिसरात वीटभट्ट्यांची वाढती संख्या : प्रदूषणाला आमंत्रण, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, “ना हरकत प्रमाणपत्र” आहे का?
नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद नगरपरिषद परिसर आणि लगतच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत वीटभट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र समोर येत आहे. वाढत्या बांधकाम व्यवसायामुळे वीट उत्पादनाला मोठी मागणी निर्माण झाली असली, तरी या वीटभट्ट्यांमुळे होणारे हवेतील वायू प्रदूषण, शेती व पर्यावरणावर होणारा गंभीर परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर निर्माण होत असलेले गंभीर प्रश्न आणि नियमांच्या अंमलबजावणी बाबत निर्माण झालेली साशंकता यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गावांच्या जवळ हद्दीलगत उभारण्यात आलेल्या अनेक वीटभट्ट्यांमधून दिवस-रात्र धूर निघत असल्याने परिसरातील हवेची ऑक्सिजन वायूची गुणवत्ता खालावत चालली आहे. विशेषतः हिवाळा आणि उन्हाळ्याच्या काळात धुराचे प्रमाण अधिक वाढत असल्याने नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, खोकला, दम्याचे झटके आणि त्वचारोग यांसारख्या समस्या वाढत असल्याच्या तक्रारी आहेत.
वीटभट्ट्यांमुळे निर्माण होणारे प्रदूषण-
वीटभट्ट्यांमध्ये कोळसा, लाकूड, टायर, प्लास्टिकसदृश टाकाऊ पदार्थ किंवा इतर इंधनांचा वापर केल्यास वातावरणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स आणि सूक्ष्म धूलिकण मोठ्या प्रमाणावर मिसळतात. हे घटक वातावरण प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरत असल्याने सतत धुराच्या संपर्कात राहिल्यास लहान मुले, वृद्ध नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना सर्वाधिक धोका निर्माण होत आहे. अनेक वेळा कपड्यांवर, घरांच्या छतांवर आणि पिण्याच्या पाण्याच्या साठ्यावर धुळीचा थर जमा होत असल्याची तक्रारही समोर आली आहे. अवैध वीटभट्ट्या हा गंभीर बनलेला प्रश्न आहे. प्रशासकीय परवानगी न घेता आणि पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून चालवल्या जाणाऱ्या या भट्ट्यांमुळे प्रदूषण, अपघात आणि महसुलाचे नुकसान असे विविध प्रश्न निर्माण होत आहेत.
अवैध वीटभट्ट्यांचे मुख्य परिणाम आणि सद्यस्थिती म्हणजे पर्यावरणाची हानी व प्रदूषण होत आहे. अनेक वीटभट्ट्या पर्यावरण विभाग किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न घेता चालवल्या जातात. यातून निघणाऱ्या धुरामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.अपघातांचा धोका: अनेक ठिकाणी महामार्गांच्या अगदी जवळ (काही ठिकाणी ५ फुटांवर) या भट्ट्या लावल्या जातात. यामुळे वाहनधारकांना धगीचा आणि धुराचा त्रास होऊन अपघाताची शक्यता निर्माण होते. वीटभट्टी व्यवसायासाठी माती आणि मुरूम उपसा करताना सरकारला रॉयल्टी भरणे बंधनकारक असते. मात्र, अवैध भट्ट्यांवर कोणतीही रॉयल्टी भरली जात नसल्याचे सांगितले जाते .
गावापासून अंतराचे नियम आणि परवानग्यांचा प्रश्न
पर्यावरणीय निकषांनुसार आणि प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित विविध नियमांनुसार वीटभट्ट्या उभारताना निवासी वस्ती, शाळा, रुग्णालये, जलस्रोत आणि शेती क्षेत्रापासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक मानले जाते. तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महसूल विभागाची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र यांचे कडे प्रदूषण मंडळाच्या परवानग्या आहेत काय?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काही ठिकाणी शेतजमिनींच्या अगदी लगत भट्ट्या सुरू असल्याने शेती उत्पादनावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.संबंधित यंत्रणांकडून नियमित तपासणी केली जाते का, परवानग्या वैध आहेत का, पर्यावरणीय अटींचे पालन होते का? असेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रदूषणयुक्त बेकायदेशीर वीटभट्ट्यांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
