केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा ; बंदुकीचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज लुटला
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंपावर गुरुवार दिनाक ९ रोजी रात्री अकराच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एका खोलीत कोंडून लाखोंचा ऐवज लांबविला.
हा दरोडा टाकण्यापूर्वी दुचाकीवर आलेल्या सहा दरोडेखोरांनी मुक्ताईनगर शहरातही एक-दोन ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. हे दरोडेखोर पेट्रोलपंपावरून मिळालेली रोकड घेऊन वरणगावकडे निघाल्याची माहिती मिळत आहे. मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर शहरालगतच रक्षा ऑटो या नावाने केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोलपंप आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मुक्ताईनगर शहराकडून दोन दुचाकीवर सुमारे पाच ते सहा दरोडेखोर या पेट्रोलपंपावर आले.

सर्वांनी तोंडावर रूमाल बांधला होता. पेट्रोलपंपावर येऊन तेथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एका केबिनमध्ये कोंडण्यात आले. या वेळी पंपावर असलेल्या काही वाहनधारकांनाही दरोडेखोरांनी मारहाण केली. त्यांचा प्रतिकार करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांनी जखमी केले. तसेच, पंपाच्या केबिनमधील ड्रॉवरमधील सुमारे एक लाखापेक्षा जास्त रोकड ताब्यात घेतली आणि तेथून दुचाकीवरून वरणगावकडे दरोडेखोर पसार झाले.
अवघ्या काही मिनिटांच्या या थरारात पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना नेमके काय झाले, हे कळलेच नाही आणि दरोडेखोर पसार झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिस व माजी मंत्री एकनाथ खडसे व रक्षा खडसे यांना दिली. त्यानंतर काही वेळातच मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंपावरील कर्मचाऱ्यांनी दरोडेखोर दुचाकीवरून वरणगावकडे गेल्याचे सांगितले. तातडीने वरणगाव पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली. मुक्ताईनगर व वरणगाव पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
