भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनरावेरसामाजिक

थोरगव्हाण ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी गैरहजर ; गावकऱ्यांमध्ये संभ्रम, कामकाज ठप्प….

थोरगव्हाण,ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज. संतोष राणे सर | गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून थोरगव्हाण ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेविका) सौ. छाया नेमाडे उपस्थित नसल्याने ग्रामपंचायतीचे नियमित कामकाज ठप्प झाले आहे. जन्मदाखले, रहिवासी दाखले, कर आकारणी, नळजोडणी आदी नागरिकांच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. थोरगव्हाण ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

ग्रामस्थांमध्ये असे समजते की सौ. नेमाडे यांची बदली होणार आहे, मात्र त्याबाबत अधिकृत माहिती न मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांमधील अंतर्गत मतभेदांमुळे नवीन ग्रामविकास अधिकारी येथे येण्यास तयार नसल्याचीही चर्चा सुरू आहे.

आमचे “मंडे टु मंडे न्युज” चे पत्रकार यांनी ग्रामविकास अधिकारी सौ. नेमाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “माझ्याकडे अजून दोन-तीन गावांचा अतिरिक्त कारभार असल्यामुळे कामाचा मोठा ताण येत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत नियमित हजेरी लावणे कठीण जाते. तरीही शक्य तितक्या प्रमाणात कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.”

दरम्यान, गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे की सदर ग्रामसेविका काही वेळा घरून कामकाज बघतात. काही अंतर्गत विषयांमुळे काही ग्रामपंचायत सदस्यांचे फोनही न उचलल्यामुळे संवादात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार विस्कळीत झाला असून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तसेच ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न झाल्यामुळेही नाराजीचे वातावरण आहे. दसऱ्यासारख्या सणाला सुद्धा कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही, आणि आता दिवाळी जवळ आली असताना ती पण अंधारात जाते का अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांची एकमुखी मागणी आहे की शासन व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून थोरगव्हाण ग्रामपंचायतीत नियमित ग्रामविकास अधिकारी नेमावा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, जेणेकरून गावाचा विकासाचा गाडा पुन्हा सुरळीत मार्गावर येईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!