सावदा नगरपरिषदेच्या वार्षिक मेंटेनन्स ठेक्याची ‘डागडुजी’ दोन दिवसांतच खचली ! रस्ता दुरुस्ती की केवळ थातूरमातूर मलमपट्टी? खड्डा पुन्हा खचला; निकृष्ट कामांबाबत नागरिकांचा संताप
सावदा | मंडे टू मंडे न्यूज चमू : सावदा नगरपरिषदेच्या प्रशासक काळात धापे टाकणे, गटार दुरुस्ती तसेच विविध किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी देण्यात आलेल्या वार्षिक मेंटेनन्स ठेक्याच्या कामांच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या ठेक्याला मुदतवाढ देण्यात आली असून, त्याअंतर्गत शहरातील विविध भागांत दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दुरुस्तीची पोलखोल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रविवार पेठ परिसरात पाईपलाईन ब्लॉकेजसाठी खोदण्यात आलेला खड्डा बुजविण्याचे काम करण्यात आले. त्यावर सिमेंट काँक्रेट टाकण्यात आले; मात्र योग्य कॉम्पॅक्शन न करताच काम उरकण्यात आल्याचा आल्याने परिणामी अवघ्या दोन दिवसांतच हा भाग पुन्हा खचला आणि तेथे नव्याने खड्डा निर्माण झाला.
‘खड्डा बुजवला की खड्ड्याची जागा बदलली?’ असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सुदैवाने या ठिकाणी अद्याप कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. मात्र, रस्त्यावरून वाहनांची तसेच नागरिकांची सतत वर्दळ असताना अशा प्रकारे दुरुस्ती केलेला भाग पुन्हा खचणे हे कामाच्या गुणवत्तेची तपासणी नेमकी होते तरी कुठे? असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे.
मेंटेनन्सच्या नावाखाली ‘मलमपट्टी’ किती दिवस?
नगरपरिषदेकडून वार्षिक मेंटेनन्सच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये किरकोळ दुरुस्तीची कामे केली जात असली, तरी दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी समस्या निर्माण होत असेल, तर नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या या खर्चाचा नेमका उपयोग किती? असा सवाल उपस्थित होत आहे.
कामाचा दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य, खड्ड्याचे योग्य पद्धतीने भराव व कॉम्पॅक्शन तसेच काँक्रेटची गुणवत्ता याबाबत नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यापूर्वी प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता तपासली जाते का? याचीही नागरिकांना उत्सुकता आहे.
‘काम झाले’ दाखवायचे की टिकणारे काम करायचे?
शहरातील रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीचा उद्देश नागरिकांना सुरक्षित व टिकाऊ सुविधा देणे हा असताना, दोन दिवसांतच दुरुस्तीचा भाग खचत असेल तर ही डागडुजी नेमकी कोणाच्या समाधानासाठी? असा मार्मिक प्रश्न आता सावद्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने रविवार पेठेतील या खचलेल्या ठिकाणाची तातडीने पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी, संबंधित ठेकेदाराकडून दोषदुरुस्ती करून घ्यावी आणि निकृष्ट काम आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता नगरपरिषद प्रशासन या ‘दोन दिवसांच्या दुरुस्ती’ची दखल घेऊन ठेकेदाराच्या कामाचा दर्जा तपासते की पुन्हा एकदा थातूरमातूर मलमपट्टी करून विषय संपवते, याकडे सावदा शहराचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

