भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

हृदयद्रावक : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जळगाव हादरले; जवानाच्या पत्नीने पाच वर्षांच्या मुलासह जीवन संपवले

जळगाव | मंडे टु मंडे न्यूज | सर्वत्र गणेशोत्सवाच्या आगमनाचा उत्साह असताना जळगाव शहरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसर सुन्न झाला आहे. तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौक परिसरात २८ वर्षीय महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलासह जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमांगिनी निखील महाजन आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा शौर्य हे सोमवारी घराच्या खालच्या मजल्यावर होते. कुटुंबातील अन्य सदस्य वरच्या मजल्यावर होते. सायंकाळच्या सुमारास निखील महाजन यांच्या आई खाली आल्या असता घराचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आवाज देऊन आणि दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. घरातील दृश्य पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला. हेमांगिनी आणि त्यांचा चिमुकला मुलगा शौर्य यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

पती भारतीय सैन्यदलात कार्यरत
हेमांगिनी यांचे पती निखील महाजन हे भारतीय सैन्यदलात कार्यरत असून राजस्थान येथे सेवा बजावत असल्याची माहिती समोर आली आहे. देशसेवेत कार्यरत असलेल्या जवानाच्या कुटुंबावर गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेमागील कारण काय?
हेमांगिनी यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचेs नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, त्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांच्या निष्पाप शौर्यच्या मृत्यूनेही परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!