शालार्थ आयडी घोटाळा ; आर्थिक गुन्हे शाखेची जळगाव जिल्ह्यात कारवाई, फरार आरोपींना अटक, शिक्षण क्षेत्रात खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शालार्थ आयडी गुन्ह्यात पुराव्यांमध्ये छेडछाड करणाऱ्या अमळनेर येथील अविनाश बळवंत पाटील याला दिनाक १५ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील आर्थिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. नाशिक पोलिसांनी दुसऱ्यांदा अमळनेरात येऊन आरोपींच्या घरांची झडती घेतली. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.शालार्थ आयडी वापरून राज्यात मोठा घोटाळा झाल्याचे उघडीकीस आले होते. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली होती.
२०१२ नंतर शिक्षक भरती बंद असतानाही बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये घेऊन बनावट शालार्थ आयडी, आदेश, वैयक्तिक मान्यता देऊन त्यांचे पगार काढून अशा सुमारे २२०० पदांची भरती फक्त जळगाव जिल्ह्यात झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानन्तर शिक्षण उपसंचालकांनी जळगावचे वेतन अधीक्षक राजमोहन शर्मा, नाशिक उपसंचालक कार्यालयातील पंचभाई यांच्यासह काही संस्थांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाची चौकशी पोलिस निरीक्षक अशोक गिरी करत होते. त्यांनी अमळनेर सह जळगाव जिल्ह्यातील काही संस्थांचे संचालक असलेल्या शरद शिंदे याना चौकशीसाठी बोलावले होते. शरद शिंदे यांच्याशी अर्थपूर्ण तडजोड करून गिरी यांनी तपासाची फाईल स्वतःकडे मागवून त्यात शरद शिंदे, किरण पाटील, अविनाश पाटील यांनी आवक जावक रजिस्टर मध्ये हेराफेरी केली आणि पुरावे नष्ट करण्याचा तसेच काही कागदपत्रे नव्याने टाकण्याचा प्रयत्न केला. तपासातच भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसून येत होता. त्यामुळे चौकशी अधिकारी अशोक गिरी यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज मधील शरद शिंदे, किरण पाटील, अविनाश पाटील यांनाही आरोपी बनवण्यात आले.
या पूर्वी नाशिक पोलिसांनी तिघांच्या घराची झडती घेऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिघेही पळून जाण्यात यशस्वी झाले होते. तिघेही पुन्हा अमळनेरात घरी असल्याची माहिती आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अतुल डहाके, सहाययक पोलीस निरीक्षक रुपेश केदार, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र गीते, शिवाजी कुलकर्णी, प्रवीण महाजन, वैभव खांडेकर, स्वप्नील जाधव असा पोलिसांचा ताफा दिनाक १५ रोजी अमळनेरात धडकला त्यांनी अविनाश पाटील याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला नाशिक येथे नेऊन अटक केली. दरम्यान शरद शिंदे आणि किरण पाटील अद्याप फरार आहेत. आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असल्याने पोलिस कसून तपास करीत आहेत.

