भुसावळात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळb; घातपाताचा संशय
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज ||शहरातील वरणगाव रोडवरील आलिशान वॉटर पार्कजवळ गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, एखाद्या वस्तूने वार करून त्याचा घातपात करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत.
दरम्यान, तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लुटीच्या उद्देशाने हा प्रकार घडला का, पूर्ववैमनस्यातून हल्ला करण्यात आला का किंवा अन्य कोणत्या कारणातून तरुणाचा मृत्यू झाला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, त्यातून घटनेबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेतला जात आहे.
मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही
मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून, बाजारपेठ पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण तसेच डोक्याला झालेल्या दुखापतीचे स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
वरणगाव रोडवरील वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने भुसावळ शहरात चर्चेला उधाण आले आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? घातपात झाला आहे का? याचा उलगडा करण्याचे आव्हान आता बाजारपेठ पोलिसांसमोर आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

